योगेश शिरसाट, प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यात घ्या, असा कोर्टाचा निर्णय आल्यानंतर वेगवेगळ्या पक्षात उलथापालथ होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान अकोला जिल्ह्यातील एका बड्या पक्षाच्या गळतीला सुरुवात झाली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीत राहिलेल्या तत्कालीन भारिप बहुजन महासंघ आणि आताचा वंचित बहुजन आघाडी पक्षाला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अकोल्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार, माजी जिल्हा कार्याध्यक्ष आणि गटनेते काशीराम साबळे, तसेच काँग्रेसचे विकास पवार यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
नक्की वाचा - Sanjay Raut Book : तुरुंगातल्या आरोपीने सुचवले संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे नाव
मंगळवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरच्या एमसीए लाउंजमध्ये पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये वंचितसह काँग्रेसचे पातूर येथील माजी नगराध्यक्ष सय्यद बुऱ्हान नबी, यांच्यासह अनेक माजी नगरसेवकही राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहेत. याशिवाय, सत्ताधारी भाजपचे अजाबराव उईके आणि डॉ.विशाल इंगोले यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.
अकोला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नेत्यांची पलायनं अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. वंचित आणि काँग्रेससारख्या तसेच सत्ताधारी भाजपा पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद, कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याने कार्यकर्त्यांमध्ये असमाधान तसेच पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या अभावामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी राष्ट्रवादीकडे वळत असून राष्ट्रवादी अजित पवार पक्ष भक्कम बळकट करणे सुरू आहे.
यादरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रास्ताविक भाषणात नव्याने प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत करून, त्यांच्या अनुभवाचा वापर अकोला जिल्ह्यातील विकास कामात करण्याचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान लोकसभा विधानसभा नंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकाधिक मजबूत कसा होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या पारड्यात आणखीन जागा मिळेल यासाठी जोमाने प्रयत्न सुरू आहे.. शहरासह, ग्रामीण भागातील रस्ते विकास, शिक्षण, आरोग्य आणि लाडकी बहीण योजना ही योजना प्रभावी ठरत असून यामुळे महिला सक्षमी करणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष भक्कमपणे कटिबद्ध होत चालला असल्याचे अकोला जिल्ह्यात चित्र आहे.