Rahul Narwekar : अलिबागच्या शेतात नेमकं काय घडलं? राहुल नार्वेकरांना शेतकऱ्याने का झापलं? वाचा सर्व माहिती

Rahul Narwekar Alibaug Land Dispute News:  हा वाद मिटवण्यासाठी राहुल नार्वेकर स्वतः त्या ठिकाणी पोहोचले होते. मात्र, परिस्थिती निवळण्याऐवजी तिथे चांगलाच राडा झाला.

जाहिरात
Read Time: 3 mins
Rahul Narwekar : संतापलेल्या रमेश पाटील आणि त्यांच्या पत्नीने कोणाचेही ऐकून घेण्यास नकार दिला.
अलिबाग:

मेहबुब जमादार, योगेश पाटील प्रतिनिधी

Rahul Narwekar Alibaug Land Dispute News:  रायगडमधील अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात सध्या एका जमिनीच्या वादावरून मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. या वादाच्या केंद्रस्थानी चक्क राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत. म्हात्रोळी गावातील एका जमिनीच्या मोजणीवरून स्थानिक शेतकरी रमेश पाटील आणि सरकारी कर्मचारी यांच्यात आधीपासूनच वाद सुरू होता. 

हा वाद मिटवण्यासाठी राहुल नार्वेकर स्वतः त्या ठिकाणी पोहोचले होते. मात्र, परिस्थिती निवळण्याऐवजी तिथे चांगलाच राडा झाला. संतापलेल्या रमेश पाटील आणि त्यांच्या पत्नीने कोणाचेही ऐकून घेण्यास नकार दिला. इतकेच नाही तर नार्वेकर यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीच्या कानाखाली देखील लगावण्यात आली.

नार्वेकरांना स्थानिक शेतकऱ्याने झापले

जमिनीच्या मोजणीसाठी कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता अधिकारी गावात दाखल झाल्याचा आरोप रमेश पाटील यांनी केला आहे. विनापरवाना आपल्या जमिनीत हे लोक कसे आले, असा सवाल करत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. 

राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि हे सरकारी काम असल्याचे सांगून वाद न घालण्याची विनंती केली. मात्र, संतापलेल्या रमेश पाटील यांनी थेट विधानसभा अध्यक्षांनाच फैलावर घेतले. मोजणीची प्रक्रिया चुकीची असल्याचे म्हणत त्यांनी नार्वेकर आणि त्यांच्या सोबत आलेल्या टीमला तिथून अक्षरशः हुसकावून लावले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Advertisement

नेमका वाद काय?

मिळालेल्या माहितीनुसार, म्हात्रोळी गावात सेजल शहा यांची सुमारे 2.5 एकर जागा राहुल नार्वेकर यांना खरेदी करायची असून त्याबाबतचा व्यवहार सुरू आहे. या जागेला लागूनच रमेश पाटील यांची जमीन आहे. 

नियमानुसार, जेव्हा एखाद्या जागेची मोजणी केली जाते, तेव्हा शेजारील जमीन मालकांना नोटीस देणे बंधनकारक असते. मात्र, रमेश पाटील यांना कोणतीही नोटीस न देता ही मोजणी सुरू होती, असा दावा त्यांनी केला आहे. यामुळेच त्यांनी आक्रमक होत नार्वेकर आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना विरोध केला.

Advertisement

( नक्की वाचा : Satara News: साताऱ्यातील शेतकऱ्याला 1 कोटी 80 लाखांचा गंडा,मुंबईच्या नगरसेविकेसह मंत्रालयातील 'बाबू' रडारवर! )

संजय राऊत यांचे गंभीर आरोप 


शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे  खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विट करत दावा केला आहे की, नार्वेकर यांना तिथे मारहाण झाली असून त्याचा सविस्तर व्हिडिओ ते लवकरच प्रसिद्ध करतील. 

राऊत यांनी केवळ मारहाणीचाच दावा केला नाही, तर नार्वेकर अलिबागमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेऊन कोकणाचे गुजरात करत असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. याआधीही मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या काळात राहुल नार्वेकर आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले होते, त्याचीच पुनरावृत्ती आता अलिबागच्या जमिनीवरून होताना दिसत आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Mulund Metro Pillar Collapse: इंजिनिअर्स काय करत होते? महापौरांनी झापले, घटनास्थळावरुनच मोठी घोषणा, VIDEO )

राहुल नार्वेकर यांनी काय स्पष्टीकरण दिले?

या सर्व आरोपांवर राहुल नार्वेकर यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथून ते जात होते. तिथे काही लोक सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ते तिथे थांबले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण न करण्याची विनंती केली.

ज्या जमिनीवरून वाद सुरू आहे, तिथे माझी कोणतीही जमीन नाही आणि माझा त्या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण नार्वेकर यांनी दिले आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय आपल्यावर आरोप केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, ज्या रमेश पाटील यांच्याशी हा वाद झाला, त्यांनीदेखील नार्वेकर यांचा या जमिनीशी संबंध नसल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे हे प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.