Ahmedabad Crime: अंबरनाथ पूर्वेतील एका गृहसंकुलात पार्किंगच्या वादातून एका महिलेने दुचाकी पेटवल्याचा आरोप करण्यात आला असून, या आगीत एक दोन नव्हे तर एकूण पाच वाहने जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रितू दिनेश कारीरा नावाच्या महिला विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
महिलेची सटकली अन पाच वाहने पेटवली
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबरनाथ पूर्वेतील दीप्ती स्कायसिटी गृहसंकुलातील रहिवासी सनी रामसिंघानी यांचा त्याच निलगिरी इमारतीत राहणाऱ्या एका महिला रितू कारीरा सोबत दुचाकी पार्किंगच्या कारणावरून वाद झाला होता. याच वादातून संबंधित महिलेने गुरुवारी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास रामसिंघानी यांची दुचाकी पेटविल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दुचाकीला लागलेली आग काही क्षणांतच भडकली आणि शेजारी उभी असलेली इतर वाहनेही आगीच्या विळख्यात सापडली. यात हर्षद पिंगळे यांची वॅगनॉर कार व एक दुचाकी, तसेच अर्जुन पांडे यांची टाटा नेक्सॉन कार आणि अॅक्टिव्हा दुचाकी अशा एकूण पाच वाहनांची राखरांगोळी झाली. सर्व वाहने जळून खाक झाल्याने वाहनमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर तक्रारदारांनी गृहसंकुलातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनास्थळी एका महिलेचा संशयास्पद वावर आढळून आल्याचे सांगण्यात आले. या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे गृहसंकुलातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.