यशपाल सोनकांबळे, पुणे:
Amit Shah Pune Visit News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना प्रदान करण्यात येणाऱ्या टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ते हजर राहणार आहेत. मात्र अमित शाहंच्या या दौऱ्याआधीच पुण्यामध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. नीट पेपर फुटीप्रकरण आंदोलनात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच निषेध म्हणून पुणे शहर काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री शहा यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर प्रशासनाने काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे.
Political News: एकाचवेळी 23 नगरसेवक होणार बाद? 'या' मनपात मोठा राजकीय भूकंप; भाजप, MIMला धक्का
अमित शाहंचा दौरा; पुण्यात राजकारण तापलं!
अमित शहांच्या पुणे दौऱ्यात आज काँग्रेस आणि भाजप आमनेसामने येणार आहेत. आज पुण्यामध्ये अमित शाहंच्या दौऱ्यादिवशी काँग्रेस आणि भाजपची स्वतंत्र आंदोलने होणार असून दोन्ही पक्षाच्या आंदोलनांना पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे सकाळी 10.15 वाजता उत्सव बिल्डिंग चौकात आंदोलन होणार आहे.
दुसरीकडे काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे महर्षीनगरातील झांबरे पॅलेस परिसरात आंदोलन होणार आहे. दोन्ही आंदोलनांमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे. शहरात संवेदनशील ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिम्मित युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. काँग्रेसचे पदाधिकारी अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख घरातून या तिघांना डिटेन करून डेक्कन पोलीस स्टेशनला आणले असल्याची माहिती अक्षय जैन यांनी दिली आहे. या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.