योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Amol Mitkari Emotional Speech : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीचा राज्यातील प्रत्येकालाच धक्का बसला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पोरकेपणाची भावना आहे. आपल्या रोखठोक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दादांनी अनेकांचे आयुष्य घडवले, पण त्यांच्या जाण्याने त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आमदार अमोल मिटकरी अक्षरशः कोलमडून पडले आहेत. आमचा सेनापतीच आम्हाला सोडून गेला, आता आम्ही कोणाच्या बळावर लढणार, असा आर्त सवाल करत मिटकरींनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.
आमचा योद्धा गेला आता कोणासाठी लढायचे?
अकोल्यातील राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यासाठी अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते त्यांचे आधारस्तंभ होते. दादांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच मिटकरींना आपले अश्रू अनावर झाले. ज्या नेत्याने शून्यातून विश्व निर्माण करायला शिकवले, तोच मार्गदर्शक हरपल्याने मिटकरी धाय मोकलून रडताना दिसले. आपला योद्धाच रणांगण सोडून गेल्याने आता कोणासाठी आणि कसे लढायचे, असा उद्विग्न प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून त्यांच्या या आक्रोशाने उपस्थित प्रत्येक जण हेलावून गेला.
चप्पल चोरण्याचा तो भावनिक किस्सा
अमोल मिटकरी यांनी या दुःखाच्या प्रसंगी अजित पवारांसोबतचा एक अत्यंत वैयक्तिक आणि भावूक किस्सा सांगितला. अकोल्यात एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला दादांनी आमदारकी दिली. मिटकरींनी स्वतःचे घर घेतले, तेव्हा दादांनी त्यांच्या वास्तूला यावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती. मात्र कामाच्या व्यापातून दादांना वेळ मिळत नव्हता. अशा वेळी दादांप्रती असलेल्या अढळ श्रद्धेपोटी मिटकरींनी चक्क देवगिरी बंगल्यावरून दादांची चप्पल चोरून आणली होती.
त्या चपलेची त्यांनी आपल्या नवीन घरात प्रतिष्ठापना करून पूजा केली होती. दादा प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत, तरी त्यांचे अस्तित्व घरात असावे ही त्यामागची भावना होती.
भाड्याच्या घरातून आमदारकीपर्यंतचा दादांनी दिलेला प्रवास
अमोल मिटकरींच्या आयुष्यातील दादांचे स्थान किती मोठे होते, हे त्यांच्या संघर्षावरून स्पष्ट होते. मिटकरींनी सांगितले की, 6 वर्षांपूर्वी त्यांच्याकडे स्वतःचे घरही नव्हते. अशा परिस्थितीत अजित पवारांचा फोन आला आणि त्यांनी आमदार करण्याची ग्वाही दिली. उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्रे नसतानाही दादांनी वकील देऊन सर्व पूर्तता करून घेतली.
दादांच्या याच विश्वासामुळे एका सामान्य कार्यकर्त्याचे रूपांतर आमदारात झाले. आज 5 वर्षांनंतर मिटकरींकडे स्वतःचे घर आहे, पण ज्यांच्यामुळे हे शक्य झाले तो राजाच आता राहिला नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
तलवारी म्यान केल्या असून कार्यकर्ते अनाथ झाले
अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अमोल मिटकरी म्हणाले की, आम्ही आज आमच्या तलवारी म्यान केल्या आहेत. ज्यांच्या आदेशावर आम्ही रणांगण गाजवायचो, तो आमचा सेनापतीच आता अनंतात विलीन झाला आहे. दादांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादीचेच नाही, तर राज्यातील लाखो कार्यकर्त्यांचे छत्र हरपले आहे. अकोल्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या शोककळा पसरली असून, आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना प्रत्येक डोळा ओलावलेला आहे.