पुणे: पुण्याच्या जिल्हा सत्र न्यायालयात घडलेल्या एका प्रकरणाची सध्या सर्वत्र सुरु आहे. एका कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात न्यायाधीशांनी तु टिकली लावत नाहीस किवा मंगळसुत्र घालत नाहीस, मग पती तुझ्यात कसा रस दाखवणार? असा सवाल केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणांवरुन सध्या माध्यमांमध्ये चर्चा सुरु आहे. याबाबत आता अंजली दमानियांनी केलेल्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, एका महिलेचा पतीविरोधात वाद सुरु होता. याचप्रकरणात तिने घरगुती हिंसाचाराचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. यावरुनच हा खटला पाहणाऱ्या न्यायाधिशांनी अजब सवाल केला. मी पाहतोय की तुम्ही टिकली लावली नाही किंवा मंगळसूत्र घातलेले नाही. जर तुम्ही विवाहित स्त्रीसारखे वागत नसाल तर तुमच्या नवऱ्याला तुमच्यात का रस असेल? असं या न्यायाधीशांनी म्हटले आहे. यावरुनच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
काय म्हणाल्यात अंजली दमानिया?
अतिशय धक्कादायक आज जागतिक महिला दिन. महिला आज अंतराळवीर आहेत, शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर्स आहेत, चार्टर्ड अकाउंटेंट आहेत, पोलिसात आहेत आणि राजकारणात देखील आहेत. किंबहुना प्रत्येक ठिकाणी आहेत. असे असताना एक पुण्याच्या फैमिली कोर्टाचे मध्यस्ती करणारे जज, महिलांना “तू कुंकू लावत नाही, मंगळसूत्र घालत नाही, तर तुझा नवरा तुझ्यात कसा रस घेईल” असे विधान करतात, असे म्हणत अंजली दमानियांनी संताप व्यक्त केला आहे.
(नक्की वाचा- कशाला एवढं ताणता, जीवावर उठता का? तो फोन... आपल्यासोबत बरंवाईट होणार हे देशमुखांना कळलं होतं?)
"एवढेच नाही तर एक महिला जर ज्यास्त कमवत असेल तर ती कमी कमावणाऱ्या नवऱ्या बरोबर नंदू शकत नाही, पण पुरुष त्यांच्या घरी भांडी घसणाऱ्या बाईशी सुद्धा लग्न करू शकतो, पुरुष जर जुळवून घेऊ शकतात तर स्त्री का करू शकत नाही, असे देखील वक्तव्य त्यांनी केले होते. अशी पुरुषप्रधान मानसिकता असणारे जज त्या पदावर नसावे अशी माझी ठाम भूमिका व मागणी आहे. महिला दिनाच्या सगळ्या महिलांना शुभेच्छा,' असं त्या म्हणाल्यात.