मिलिंद भागवत, प्रतिनिधी
Wari 2026: टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि विठू माऊलीच्या ओढीने निघालेल्या वारकऱ्यांची पावले... महाराष्ट्राच्या मातीत आषाढी वारीचे एक वेगळेच आध्यात्मिक आणि भावनिक महत्त्व आहे. एक तरी ओवी अनुभवावी आणि आयुष्यात किमान एक तरी वारी करावी, अशी प्रत्येक भाविकाची सुप्त इच्छा असते. सध्या सुरु असलेल्या आषाढी वारीमध्ये ऊन-पावसाची तमा न बाळगता देश-विदेशातून लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर चालू लागले आहेत. यंदाच्या वारीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते अवघ्या काही महिन्यांच्या दोन गोड जुळ्या वारकऱ्यांनी. आपल्या चिमुरड्या पावलांनी वारीचा आध्यात्मिक वारसा पुढे नेणाऱ्या या दोन बाल गोपाळांची गोष्ट सध्या विठ्ठल भक्तांमध्ये कौतुकाचा विषय ठरली आहे.
कोल्हापूरच्या पाटलांचे दोन चिमुरडे विठ्ठल भक्त
यंदाच्या आषाढी वारीत कोल्हापूर येथील आदित्य पाटील हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची दोन लहान जुळी मुले देखील वारीची वाट चालत आहेत. शिवांश आणि आद्यन अशी या जुळ्या भावंडांची नावे आहेत. इतक्या लहान वयात या चिमुरड्यांना वारीत आणण्यामागे त्यांच्या पालकांचा एक उदात्त विचार आहे. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आणि विठू माऊलीचे आपण काहीतरी देणे लागतो, याच भावनेतून वारी करत असल्याचे आदित्य पाटील सांगतात.
शिकवून नाही तर वारीत घडवून संस्कार
आपल्या मुलांवर लहानपणापासूनच संस्कृतीचे आणि इतिहासाचे संस्कार व्हावेत, अशी आदित्य पाटील यांची इच्छा आहे. वारीसोबतच त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासही जवळून अनुभवायचा आहे. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे रायगडावर आहेत आणि विठू माऊली पंढरपुरात आहे, हे मुलांना मोठे झाल्यावर आपोआप समजले पाहिजे. हे केवळ तोंडपाठ शिकवून नाही, तर त्यांना स्वतः या प्रवासाचा भाग बनवून घडवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. म्हणूनच वारीसोबत ते मुलांना दुर्गभ्रमंतीचीही सफर घडवून आणतात.
वारीच्या वाटेवर चिमुरडे रमले
आदित्य पाटील यांच्या पत्नी अवंतिका पाटील यांनी सांगितले की, यंदा ते लोणंदपर्यंत वारीमध्ये सहभागी होणार आहेत. अत्यंत कमी वयाची असूनही ही दोन्ही चिमुरडी वारीच्या या भारावून टाकणाऱ्या वातावरणात आणि भक्तीत अगदी छान रमली आहेत. त्यांना प्रवासात कोणताही त्रास होत नसून वारकऱ्यांच्या गराड्यात ते अतिशय आनंदी आहेत.
भागवत धर्माचा वारसा नव्या पिढीकडे
आपल्या संस्कृतीचा आणि वारीचा हा समृद्ध वारसा या लहान मुलांच्या मनात अगदी सुरुवातीपासून रुजावा, यासाठी पाटील कुटुंब करत असलेले हे प्रयत्न खरोखरच दिशादर्शक आहेत. शिवांश आणि आद्यन यांच्यासारख्या छोट्या वारकऱ्यांकडे पाहिल्यावर, महाराष्ट्राची ही भागवत धर्माची शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा पुढेही तितक्याच भक्कमपणे सुरू राहील, अशी खात्री त्यांच्याकडं पाहून पटते.