आकाश सावंत
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख, परळीचे महादेव मुंडे यांच्याप्रमाणेच सरपंच बापू आंधळे यांचा खूनही वाल्मिक कराड याने केला असून यामागेही धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्याने केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर याने म्हटले की, वाल्मिक कराड हा प्यादं आहे. त्याच्या पाठीमागे धनंजय मुंडे यांची ताकद होती, त्या ताकदीने हे सर्व करवून घेतले आहे' बांगर यांनी पुढे म्हटले की, प्रत्येक चुकीत तुम्हीच आहात, प्रत्येक गुन्ह्यात तुम्हीच आहात, समाजाचे गुन्हेगार तुम्हीच आहात. धनंजय मुंडेंवर टीका करण्यासाठी बांगर यांनी हे शब्द वापरले. ठाण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी, जगाच्या पाठीवर कोणत्याही घटनेची, व्यक्तीची, जिल्ह्याची, जातीची बदनामी 200 दिवस मिडीया ट्रायल द्वारे झाली नसेल. ती मिडीया ट्रायल मी सहन केली आहे. त्या दोनशे दिवसांत दोन वेळा मरता-मरता वाचलो असे म्हटले होते. त्यावर बोलताना बांगर यांनी धनंजय मुंडेवर सडकून टीका केली.
काय आहे शिवराज बांगर यांचा आरोप?
शिवराज बांगर यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासंदर्भात धक्कादायक गौप्यस्फोट केले. बांगर म्हणाले, "माझ्याही खुनाची सुपारी वाल्मिक कराडने दिली होती. माझे हातपाय तोडताना वाल्मिक कराडला लाईव्ह पाहायचे होते. ज्याला सुपारी दिली होती, त्या सनी आठवलेने खून केला नाही म्हणून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले."
बापू आंधळे खून प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी
परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे बबन गीते यांनी निवडणूक लढवली होती. बापू आंधळे खून प्रकरणात बबन गीतेंवर आरोप आहेत आणि ते फरार आहेत. बापू आंधळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यादरम्यान महादेव गीते हा जखमी झाला होता. त्याच्यावर गोट्या गीतेने गोळ्या झाडल्या होत्या. महादेव गीतेंवर बापू आंधळे यांच्या खुनाचा आरोप करून त्यांना अटक करण्यात आली. महादेव गीते यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करण्यात येत आहे. बबन गीते यांना विधानसभा निवडणूक लढवता येऊ नये यासाठी त्यांनाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा आरोप शिवराज बांगर यांनी केला आहे. बांगर यांनी मागणी केली आहे की बापू आंधळे खून प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात यावी कारण या सगळ्यामागे वाल्मिक कराड आहे असा शिवराज बांगर यांनी आरोप केलाय.