देवा राखुंडे, प्रतिनिधी
Baramati Nagar Parishad: निवडणूक म्हटलं की मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून मोठी आणि कधीकधी अशक्य वाटणारी आश्वासने दिली जातात. कधी मोफत सुविधा, तर कधी थेट आर्थिक मदतीचे आमिष दाखवले जाते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या बारामतीमध्येही नगरपरिषद निवडणुकीचा रंग चांगलाच चढला आहे. याच निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे (बसपा) महाराष्ट्र राज्याचे महासचिव काळूराम चौधरी यांनी अशीच एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ज्याची संपूर्ण राज्यात चर्चा सुरु आहे.
नगराध्यक्ष झाल्यास 10,000 रुपये आणि 1BHK
बसपाचे उमेदवार काळूराम चौधरी यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्षपदासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी बारामतीकरांना आकर्षित करणारे मोठे आश्वासन दिले. बारामतीकरांनी आपल्याला नगरपरिषदेत सेवा करण्याची संधी दिल्यास ते प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 10,000 रुपये त्याला 1BHK घर उपलब्ध करून देणार असल्याचं, त्यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : Amravati News : अमरावतीत किन्नर महामंडलेश्वरांच्या बळजबरी धर्मांतराचा गंभीर प्रकार! पोलिसांवर गंभीर आरोप )
कशी मिळणार मदत?
अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चौधरी यांनी बारामतीकरांना आपली सेवा करण्याची संधी देण्याची मागणी करताना त्यांच्या योजनेचा स्रोतही सांगितला. 'माझ्या लाडक्या बहिणींना दीड ते दोन हजार रुपये आमच्याच पैशांतून तुम्ही देत असाल, तर मी एका कुटुंबाला 10,000 रुपये देईन,' असे ते म्हणाले. हा निधी नगरपरिषदेच्या बजेटमधूनच दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
घरांसोबतच शिक्षणावरही भर
चौधरी यांनी बारामतीतील घरांच्या समस्येवरही तोडगा काढण्याचा दावा केला. ते म्हणाले, "मागेल त्याला वन बीएचके (1BHK) घर देईन." बारामतीच्या वेशीवरील मारुतीरायाचा आशीर्वाद आपल्याला लाभला असून, आपला विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यासोबतच, बारामतीकरांना अमेरिकेच्या धर्तीवर उत्तम शिक्षण देण्याचे मत देखील त्यांनी मांडले.
( नक्की वाचा : कर्जमुक्तीचा महामंत्र! 6 वर्षांत 53 लाखांचे Home Loan फेडणाऱ्या इंजिनियरने सांगितल्या 'या' 6 खास टिप्स )
पवारांच्या नेतृत्वावर टीका
यावेळी त्यांनी विद्यमान सत्ताधारी आणि पवारांच्या जवळील नेत्यांवर तीव्र शब्दांत टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या विकास योजनांचा निधी 'पवारांचे मलिदा गँग' खात आहेत. तो सर्व निधी बारामतीकरांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपरिषदेच्या कारभारावर टीका करताना त्यांनी घरपट्टी आणि पाणीपट्टीचा मुद्दा उचलला. ते म्हणाले की, जगात कुठेही नसेल इतकी घरपट्टी आणि पाणीपट्टी बारामतीत आकारली जाते, पण त्या तुलनेत नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. पवारांच्या जवळील नगरसेवक आणि नेत्यांच्या मोकळ्या जागांमध्येही रस्ते झाले आहेत, पण दलित वस्तीत मात्र कोणत्याही सुविधा नाहीत, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
इथे पाहा संपूर्ण VIDEO