देवा राखुंडे, प्रतिनिधी:
Baramati Accident News: बारामतीमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. बारामतीच्या खंडोबानगर रविवारी भयंकर अपघात झाला. डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या या अपघातात वडील आणि सोबत असलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर मुलगा आणि दोन नातींच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र आचार्य यांचाही मृत्यू झाला. एकाच घरातील चौघांचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने संपूर्ण बारामती शहर सुन्न झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मालवाहू डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत घटनेत वडिलांसह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बारामतीत रविवारी घडली होती. मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात सकाळी साडेअकराच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाला. या दुर्घटनेत ओंकार आचार्य (सणसर, तालुका इंदापूर, सध्या रा. मोरगाव रोड, बारामती) यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुली मधुरा व सई यांना आपला जीव गमवावा. ओंकार आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या दोन मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Shocking News: एका वर्षाच्या बाळाने नागाचा चावा घेतला, क्षणात सापाचा मृत्यू; असं कसं घडलं?
या घटनेनंतर आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. हा धक्का सहन न झाल्याने आणि अपघातात आपला मुलगा आणि दोन्ही नातींनी जीव गमावल्याच्या विरहातून राजेंद्र आचार्य यांचेही निधन झाले आहे. यामुळे आचार्य कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. आधी पित्यासह दोन नातींचा मृत्यू अन् आता आजोबांनीही जीव सोडल्याने आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुप्रिया सुळे हळहळल्या..
या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. बारामती येथील खंडोबानगर येथे काल झालेल्या भीषण अपघातात ओंकार आचार्य आणि त्यांच्या दोन मुली सई आणि मधुरा यांचे निधन झाल्यानंतर आज ओंकार यांचे वडील आणि सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र आचार्य यांचे निधन झाल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. त्यांच्या निधनामुळे आचार्य कुटुंबियांवर कोसळलेल्या अपार दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्वीट त्यांनी केले आहे.