अभय भुते, भंडारा:
Bhandara News: भंडारा जिल्ह्यामधून एक अजब प्रकार समोर आला आहे. अवकाशातून दगडाचे तुकडे पडल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यामध्ये घडला आहे. या धक्कादायक प्रकाराने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. हा उल्का असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून याबाबत आता तपास सुरु झाला आहे. खगोलीय अभ्यासक यावर अभ्यास करणार आहेत.
अवकाशातून पडले दगड
भंडारा तालुक्यातील परसोडी परिसरात आकाशातून दगडाचे दोन तुकडे पडल्याची घटना समोर आली. अचानक घडलेल्या या घटनेने नागरिक भयभीत झाले. वैज्ञानिक कुतूहलही निर्माण झाले आहे. ९ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास घडलेला हा प्रकार उल्का पडण्याचा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र हे दगड हलक्या वजनाचे असल्याने खगोलीय अभ्यासकांना याचा अभ्यास करावा लागणार आहे.
दोन्ही दगड पोलिस प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. परसोडी येथील सुगत बुद्ध विहाराजवळ राहणाऱ्या किशोर वाहने यांनी या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिस ठाण्यात दिली. याची माहिती किशोर वाहने यांनी दगडांची पाहणी केली व पोलिसांना माहिती दिली. वाहने यांनी ११ जानेवारीला सकाळी ९ वाजता हे दोन्ही तुकडे पोलिस ठाण्यात जमा केले.
खगोल अभ्यासक करणार तपास
दरम्यान, दगडांचे नमुने सखोल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी दिलेल्या माहितीनुसार कलकत्ता येथील वरिष्ठ चमू तपासणीसाठी येणार आहेत.