- नर्सना वैद्यकीय सेवा शिकण्याऐवजी भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात साफसफाईसाठी वापरले जात आहे
- नर्सिंगच्या विद्यार्थिनींना रुग्णालयातील बेड व भिंती पुसायला लावले जात आहे
- नर्सिंग प्रशिक्षणात रुग्णांची प्रत्यक्ष काळजी घेणे, औषधोपचार व आपत्कालीन परिस्थिती हाताळणे यावर भर दिला जातो
अभय भुते
वैद्यकीय सेवेत परिचारिका म्हणजेच नर्स या महत्वाची भूमीका बजावत असतात. त्यांना वैद्यकीय सेवेचा पाठीचा कणा मानले जाते. मात्र रुग्णसेवेचे स्वप्न उरात बाळगून परिचर्या प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मात्र वेगळ्याच गोष्टी कराव्या लागत आहे. त्यांना वैद्यकीय प्रशिक्षणाऐवजी साफसफाईची कामं करावी लागत आहे. ही धक्कादायक बाब उघड झाली असून त्याचा व्हिडीओ ही व्हायरल होत आहे. ही घटना भंडाऱ्यात समोर आली आहे. रुग्णालयातील कक्षातील बेड व भिंती पुसणे,स्वच्छता करणे अशी कामे करण्यास या नर्सना भाग पाडले जात असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
परिचर्या हे एक अतिशय जबाबदारीचे आणि सन्मानाचे क्षेत्र आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थिनींनी रुग्णांची सुश्रूषा करणे, औषधोपचार समजून घेणे, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे याचे शिकणे अपेक्षित असते. मात्र ज्या हातांनी स्टेथोस्कोप आणि बीपी मशीन हाताळून रुग्णांचे प्राण वाचवण्याचे शिक्षण घ्यायला हवे, त्या हातांत झाडू आणि पोछा देणे हा हे केवळ त्या विद्यार्थिनींचेच नाही, तर रुग्णसेवेच्या गुणवत्तेचेही मोठे नुकसान आहे. नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिंनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेड आणि भिंती पुसत असतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रात्यक्षिक किंवा क्लिनिकल ट्रेनिंग दरम्यान प्रामुख्याने रुग्णांची प्रत्यक्ष काळजी घेणे, औषध प्रशासन, जखमेची मलमपट्टी, आणि रुग्णांच्या नोंदी ठेवण्याचे काम करावे लागते. मात्र प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांकडून जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका वॉर्डच्या सफाईची कामे करून घेण्यात आली. असा आरोप काही विद्यार्थिनींनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे. रुग्णालयात कोणीतरी मोठे अधिकारी येणार असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांना कक्षाची साफसफाई करायची होती. मात्र प्रात्यक्षिक करण्यासाठी आलेल्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनाच सामान्य रुग्णालयातील बेड आणि भिंती पाण्याने स्वच्छ पुसण्यास सांगण्यात आल्या.
साफसफाई करतानाचा व्हिडीओ आता वाऱ्या सारखा व्हायरल झाला आहे. जिल्ह्यात याची चर्चा ही जोरदार आहे. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले या संदर्भात चौकशी समिती गठित केली आहे. ही समिती सत्यता काय आहे याची पडताळणी करेल. त्यानंतर चौकशी अहवाला सादर केला जाईल. यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र या घटनेनं नर्सचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना ही मोठा धक्का बसला आहे.