Vidarbha Railway News : विदर्भातील रेल्वे प्रवाशांचे स्वप्न साकार; एका निर्णयाने बदलणार रेल्वे प्रवासाचे चित्र

Gondia Jabalpur Railway News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने रेल्वे मार्गवाढीच्या 3 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Gondia Jabalpur Railway News : या निर्णयामुळे विदर्भातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.
मुंबई:

Gondia Jabalpur Railway News : गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने रेल्वे मार्गवाढीच्या 3 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली असून यात महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोंदिया - जबलपूर मार्गाचा समावेश आहे. या निर्णयामुळे विदर्भ आणि मध्य प्रदेशातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार असून प्रवाशांचा वेळ वाचण्यास मोठी मदत होणार आहे.

कसा आहे रेल्वे मार्ग?

केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयानुसार रेल्वे मंत्रालयाच्या एकूण 9,072 कोटी रुपयांच्या तीन मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड या चार राज्यांतील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या सध्याच्या जाळ्यात सुमारे 307 कि.मी. नवीन मार्गांची भर पडणार आहे. गोंदिया-जबलपूर दुहेरीकरणासोबतच पुनारख-किऊल आणि गम्हरिया-चांडिल या मार्गांच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनच्या कामांनाही वेग मिळणार आहे.

( नक्की वाचा : Mumbai-Nashik Local : 18 बोगदे, सह्याद्रीच्या रांगा आणि 3 प्रमुख स्टेशन; मुंबई-नाशिक लोकल कशी धावणार? वाचा )

रेल्वे मार्गाच्या या विस्तारीकरणामुळे जवळपास 5,407 गावे आणि सुमारे 98 लाख लोकसंख्येला रेल्वेचा थेट आणि चांगला संपर्क मिळणार आहे. सध्या अनेक मार्गांवर रेल्वेची गर्दी आणि संथ गती ही मोठी समस्या आहे, मात्र या नवीन ट्रॅकिंग प्रकल्पांमुळे रेल्वेची कार्यक्षमता वाढेल आणि सेवा अधिक विश्वासार्ह होईल. विशेषतः गोंदिया आणि आजूबाजूच्या परिसरातील प्रवाशांसाठी जबलपूरकडे जाणारा मार्ग दुहेरी झाल्यामुळे रेल्वे गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी लागणारा वेळ वाचणार असून वाहतूक अधिक वेगवान होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन भारत दृष्टिकोनातून हे प्रकल्प आखण्यात आले असून प्रादेशिक विकासावर यात मोठा भर देण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि नागरिक आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल. तसेच प्रधानमंत्री गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनअंतर्गत या कामांचे नियोजन करण्यात आले असून यामुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक अधिक सुलभ आणि अखंडित होणार आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Kalyan News: 15 मिनिटांत ऐरोली आणि थेट तळोजा मेट्रो! कल्याणकरांच्या प्रवासाचा 'कायापालट' करणारा 'मेगा प्लॅन' )
 

पर्यटनाच्या दृष्टीनेही हे मार्ग अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. जबलपूरमधील कचनार शिव मंदिर, धुआंधार धबधबा, बालाघाटमधील कान्हा राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान यांसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे आता पर्यटकांसाठी अधिक सोपे होईल. याशिवाय कोळसा, पोलाद, सिमेंट आणि अन्नधान्य यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी हे मार्ग महत्त्वाचे दुवे ठरतील. या नवीन रेल्वे लाईनमुळे दरवर्षी 52 दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक करणे शक्य होणार आहे.

पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशानेही हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. रेल्वे ही रस्ते वाहतुकीच्या तुलनेत अधिक ऊर्जा-कार्यक्षम असल्याने यामुळे इंधनाची मोठी बचत होईल. या प्रकल्पामुळे दरवर्षी सुमारे 6 कोटी लिटर तेल आयातीत बचत होणार असून 30 कोटी किलोग्रॅम कार्बन उत्सर्जन कमी होईल. हे उत्सर्जन कमी होणे म्हणजे सुमारे 1 कोटी झाडे लावण्याइतके फायदेशीर ठरणार आहे, ज्यामुळे देशाच्या हवामान उद्दिष्टांना मोठी मदत मिळेल.

Advertisement