Sandeep Deshpande News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय संतोष धुरी यांनी भाजपचे कमळ हाती घेतल्याने ते सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. या सर्व चर्चांवर आता स्वतः संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या सर्व अफवा असून त्याला पूर्णविराम द्यावा, असं ते म्हणालेत.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
"संदीप देशपांडेंनी मनसे पक्ष सोडला, भाजप प्रवेश केला, मला माध्यमांसमोर बोलायला बंदी घातली आहे, अशा बातम्या मी पाहिल्या. याला आता पूर्णविराम द्यावा लागेल असा कोणताही विषय नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच आहे. माझ्या पक्षाचे मी प्रामणिकपणे काम करतोय. माझ्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, त्यासाठी मी प्रयत्न करतोय. मुंबई अध्यक्ष म्हणून माझी ती जबाबदारी आहे, असं संदीप देशपांडेनी स्पष्ट केले.
"संतोष धुरी काय बोलतोय त्याच्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रतिक्रिया देणे गरजेचे नाही. तो त्याच्या दृष्टिकोनातून बोलतोय, मी माझ्या दृष्टिकोनातून बोलतोय. तो त्याच्या दृष्टिकोनातून बोलतोय, मी माझ्या दृष्टिकोनातून बोलत आहे. त्याचा निर्णय त्याने घेतला आहे. त्याचा निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे हे येणारा काळ ठरवेल, त्याने त्याचा निर्णय घेतला आहे, मी माझा निर्णय घेतला, त्याच्या प्रत्येक स्टेटमेंटला उत्तर द्यावे असे नाही," असं संदीप देशपांडे म्हणाले.
पक्षाचा निर्णय मान्य...
"मला २०१२ ला राजसाहेबांनी तिकीट दिले तेव्हाही अनेक जण इच्छुक होते, त्यावेळीही अनेकांना डावलून मला तिकीट दिले. त्यावेळी मी नाही विचारले की सर्वांना डावलून मला का तिकीट दिले? आता एखाद्या प्रक्रियेत मी नसलो तरी मी त्यांना का विचारु? हा पक्षाचा निर्णय आहे, तो मान्य करायला पाहिजे. यामध्ये नाराज असण्याचे कारण नाही," असंही ते म्हणाले.
"युती म्हटल्यानंतर जागा वाटप, चर्चांमध्ये १०० टक्के समाधानी कोणीच असू शकत नाही. ती प्रक्रिया आहे, त्याचा तो भाग आहे. आम्ही पहिल्यांदाच युती केली आहे, या प्रक्रियेत नवीन आहोत त्यामुळे कदाचित कार्यकर्ते नाराज असतील. आता आमच्यासमोर एकच उद्दिष्ट आहे की ज्या आम्हाला ५२ जागा मिळाल्या आहेत, त्यापैकी जास्तीत जास्त निवडून कसा आणता येईल. याकडे लक्ष द्यायचे आहे. सर्व मनसैनिकांनी आपला उमेदवार निवडून आणावा" असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.