Chhattisgarh Naxlist Attack: गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडच्या सिमेवर सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी सुरु आहेत. आज पुन्हा एकदा नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या हल्ल्यामध्ये 9 जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी थेट जवानांच्या गाडीवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दंतेवाडा/नारायणपूर/विजापूरची संयुक्त जवानांची टीम एक ऑपरेशननंतर परतत होती. 06.01.2025 रोजी, सुमारे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास जिल्हा विजापूर च्या कुत्रु पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ अज्ञात माओवाद्यांनी आयईडी स्फोटाने सुरक्षा दलाचे वाहन उडवले, ज्यामध्ये दंतेवाडा डीआरजी 08 जवान आणि एक चालक असे 9 जण शहीद झाल्याची माहिती आहे.
पोलीस अधिक्षकांनी याबाबत अधिकृत माहिती दुिली आहे. विजापूरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दंतेवाडा डीआरजी (जिल्हा राखीव गार्ड) चे 8 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात चालकाचाही मृत्यू झाला आहे. दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूर येथे संयुक्त कारवाई करून हे सर्वजण परतत होते.
नक्षल एडीजी विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी रात्री 2:15 च्या सुमारास हल्ला केला. विजापूरच्या कुतुर रस्त्यावर आयईडीचा स्फोट करुन नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांचे वाहन टार्गेट केले. त्या वाहनात 9 पेक्षा जास्त जवान होते. हा स्फोट इतका भयंकर होता की रस्त्यावर भलामोठा खड्डा पडला आहे. स्फोटात छिन्नविछिन्न अवस्थेत जवानांचे मृतदेह सापडलेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी सुरक्षा दलांनी गरीबीबंद जिल्ह्यातील नक्षलग्रस्त सोरनामल जंगलात नक्षलवाद्यांवर कारवाई केली होती. भारतीय जवानांनी ३ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. डीआरजी (जिल्हा राखीव रक्षक) आणि एसटीएफ (स्पेशल टास्क फोर्स) पथकांनी नक्षलवाद्यांना घेरले होते. छत्तीसगड आणि ओडिशातील सुमारे 300 सैनिकही या कारवाईत सहभागी झाले होते.