अमोल गावंडे
बुलढाणा जिल्ह्यात असं एक गाव आहे ज्या गावातल्या लोकांनी गेल्या आठवड्यापासून आंघोळ केली नाही. आंघोळीचा जणू या गावकऱ्यांनी धसका घेतला आहे. त्याला कारण ही तसेच आहे. शिवाय प्रशासनाने ही गावकऱ्यांना पाण्याचा वापर आंघोळीसाठी करू नये असं फर्मान काढलं आहे. ते गाव आहे गोंडगाव. हे बुलढाणा जिल्ह्यात असून या गावाला एका विचित्र आजाराने ग्रासलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचीही झोप त्यामुळे उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात गोंडगाव आहे. या गावासहीत चार गावातील लोकांनी सध्या आंघोळीची धास्ती घेतली आहे. या गावातील लोकांना केस गळतीची लागण झाली आहे. सुरुवातीला चार गावांसाठी मर्यादीत असलेली ही केस गळती जवळपास आता 11 गावातील नागरिकांना झाली आहे. सुरूवातीला जवळपास 51 जणांचे केस गळले होते. मात्र या रुग्णांची संख्या आता वाढली आहे. ही संख्या जवळपास 100 वर गेली आहे.
त्यात पाण्याचा वापर आंघोळीसाठी करू नये असे आवाहन प्रशासनाने यागावातील लोकांना केले आहे. त्यामुळे मागील आठवडाभरापासून गोंडगाव येथील गावकऱ्यांनी आंघोळीच केली नसल्याची बाप समोर आली आहे. केस गळतीचे प्रकरणं समोर आल्यावर आरोग्य पथक गावात ठाण मांडून बसले आहे. लागण झालेल्या रुग्णांची स्किन आणि केसांचे नमुने घेतले जात आहेत. ते आता प्रयोगशाळेत ही पाठविले आहेत.
त्यानंतर त्वचा तज्ज्ञांच्या सूचनेनुसार या भागातील पाण्यातील लीड आणि आर्सेनिकच्या प्रमाणाच्या तपासणीसाठी त्याचे नमुने सुद्धा नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल येण्यास किमान आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आरोग्य विभागाने बाधित गावातील नागरिकांची तपासणी सुरू केली आहे. यापूर्वी काही गावातील पाण्याचे जैविक, रासायनिक नमुने तपासले असून त्यांचा अहवाल मिळाला आहे. त्यात टीडीएस आणि नायट्रेडचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले.