अमोल सराफ, बुलढाणा:
Buldhana Google Boy News: बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील डोणगाव येथील अवघ्या दोन वर्षे आठ महिन्यांच्या क्षितिज विशाल बाजडने आपल्या अवर्णनीय बुद्धिमत्तेने देशभरात खळबळ उडवली आहे. जगातील ७१ देशांच्या राजधानींची नावे केवळ २ मिनिटे ३० सेकंदात सांगितल्याने त्याने 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये आपले नाव कोरले आहे.
बुलढाण्याचा गुगल बॉय
संगणकापेक्षाही वेगवान स्मरणशक्ती आणि नदीला पूर यावा तशी बुद्धिमत्ता असलेल्या या चिमुकल्याने बुलढाणा जिल्ह्याचा झेंडा देशपातळीवर फडकावला आहे.क्षितिजच्या या विलक्षण प्रतिभेची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्याला अधिकृत प्रमाणपत्र, मेडल आणि सन्मानचिन्हाने गौरविले आहे. ज्या वयात मुले नीट बोलू शकत नाहीत, त्या वयात क्षितिजला जगाचा नकाशा आणि विविध देशांच्या राजधानी तोंडपाठ आहेत. अमेरिका-वॉशिंग्टन, जपान-टोकियो, ब्राझील-ब्रासिलिया यांसारख्या देशांच्या राजधानी एका श्वासात सांगणाऱ्या क्षितिजने तज्ज्ञांना थक्क केले आहे.
त्याच्या या कामगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लाखो लोक त्याच्या प्रतिभेला सलाम करत आहेत.पालकांच्या प्रोत्साहनाने घडले चमत्कारक्षितिजची आई सौ. सोनाली बाजड आणि वडील विशाल बाजड यांनी त्याच्यातील सुप्त गुण ओळखले आणि खूप महत्त्वाची भूमिका बजावली. खेळाच्या वयात रटाळ अभ्यासाऐवजी रंजक पद्धतीने जगाच्या नकाशाची माहिती देण्यास सुरुवात केली. गाणी, खेळ आणि चित्रे यांच्याद्वारे देश-राजधानी शिकवत पालकांनी क्षितिजला प्रेरित केले.
चिमुकल्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
अवघ्या काही दिवसांतच हा कठीण टप्पा पार करणाऱ्या क्षितिजच्या यशात त्याच्या जिद्दीसोबत पालकांच्या कष्टांचा मोठा वाटा आहे. "आम्ही त्याला दबाव टाकला नाही, फक्त त्याच्या आवडीला चालना दिली," असे आई सोनाली सांगतात.जिल्ह्यातील अभिमान, भविष्यातील 'गुगल बॉय'क्षितिजच्या या जागतिक विक्रमामुळे डोणगाव ग्रामस्थांसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि शैक्षणिक मान्यवरांनी त्याला शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर #KshitijGoogleBoy आणि #BuldhanaPride असे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. भविष्यातील 'गुगल बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षितिजच्या या यशाने जिल्ह्यातील प्रत्येकाच्या डोळ्यात अभिमानाचे दिवे भरणारे आहेत.
अशा प्रतिभावान मुलांना प्रोत्साहन देत जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घ्यावा, असा आग्रह होत आहे.क्षितिजसारख्या चिमुकल्याच्या या कमालने सिद्ध होते की, योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाने कोणतीही उंच शिखरे गाठता येतात. बुलढाणा जिल्हा आता क्षितिजच्या नावाने जगभरात ओळखला जाईल.