Buldana News: 22 गुंठे शेती गेली, 5 वर्ष झाली मोबदला नाही, उलट 50 हजाराचा खर्च, शेतकऱ्याची करुण कहाणी

उलट संपूर्ण जमिनीचै पैसे मागितल्यानंतर अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे त्यांना मिळत आहेत असं त्यांनीच सांगितलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
बुलडाणा:

अमोल गावंडे

एका शेतकऱ्याची जमीन तलावात गेली. पण पाच वर्ष उलटूनही त्याला मोबदलाच मिळाला नाही. उलट अर्ज आणि विनंत्या करण्यावर 50  हजाराचा खर्च झाला. यामुळे 65 वर्षाचा शेतकरी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकला आहे. तरही प्रशासनाला त्याची दया येत नाही. त्यामुळे यापुढे करायचे काय असा प्रश्न या शेतकऱ्याला पडला आहे. हक्काची जमीन गेली. पण मोबदलाही मिळाला नाही. त्यामुळे आपण दुहेरी संकटात सापडल्याची भावना या शेतकऱ्याची झाली आहे. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील किन्ही सवडत इथल्या शेतकऱ्या बरोबर घडली आहे.  

प्रकाश धुरंदर असं या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याचं वय 65 वर्ष आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या किन्ही सवडत इथला तो रहिवाशी आहे. त्यांची शेती तलावात गेली. त्याचा मोबदला मिळावा ,म्हणून जलसंधारण विभागाचे कार्यालयात  मागील पाच वर्षांपासून चकरा मारत आहेत. त्यांना त्यांच्या शेतीचा मोबदला अद्याप मिळाला नाही. मात्र सरकारी कार्यालयात अर्ज करण्यासाठी आणि चकरा मारण्यासाठी त्यांचे 50 हजार रुपयांच्या वर पैसे खर्च झाले आहेत. 

नक्की वाचा - Nanded News: अशोक चव्हाण दिड वर्षानंतर दिसले काँग्रेसच्या व्यासपीठावर, कारण काय?

शेतकरी प्रकाश धुरंदर यांची वैरागड शिवारात शेती आहे. त्या ठिकाणी तलावाचे काम सुरू आहे. या तलावाचे बाधित क्षेत्रात त्यांची 22 गुंठे शेती गेली आहे. शेतीमधील विहीर ही गेली आहे. त्याच बरोबर  सिताफळाची झाडे ही या तलावामुळे गेली आहेत. मात्र जलसंधारणचे अधिकारी त्यांना कधी 8 गुंठा शेतीचे पैसे घ्या म्हणतात तर कधी 12 गुंठा शेतीचे पैसे घ्या असं सांगतात.  तर शेतकरी धुरंदर आपल्या संपूर्ण शेतीचे पैसे द्यावे अशी मागणी वेळोवेळी करत आले आहेत. पण त्यांची दखल सरकारी अधिकारी काही घेत नाहीत असा त्यांचा आरोप आहे.  

नक्की वाचा - Pune News: पुण्याच्या 'या' डॉक्टरांचे चाहते झाले आनंद महिंद्रा, कारण ही आहे खास

उलट संपूर्ण जमिनीचै पैसे मागितल्यानंतर अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे त्यांना मिळत आहेत असं त्यांनीच सांगितलं आहे. शिवाय जलसंधारण अधिकारी कार्यालयात कधीच राहत नसल्याचे ही शेतकरी धुरंदर सांगतात. आता न्याय कोणाला मागायचा असाही प्रश्न त्यांनी केला आहे. हक्काची शेती गेली. पण मोबदला पाच वर्षे उलटली तरी मिळाला नाही. उलट पदरचे पैसे खर्च करावे लागले. त्यामुळे आपल्याला कोणी वाली आहे की नाही असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. आपल्याला मोबदला मिळालाच पाहीजे त्यासाठी संघर्ष करण्याची तयारीही त्यांनी केली आहे.  

Advertisement