घरात आई-वडील डॉक्टर, त्यामुळे आपल्या मुलीने ही डॉक्टरच बनावं अशी आईची इच्छा होती. पण मुलीची इच्छा काही वेगळीच होती. त्यामुळे तिने कला विभाग निवडलं. विशेष म्हणजे म्हणजे कोणताही क्लास न लावता या मुलीने सीबीएससी बोर्डात राज्यात सर्व विभागातून पहिला क्रमांक पटकावला आहे. संभाजीनगर शहरात राहणारी चैत्रा दिवाणनं ही जबरदस्त कामगिरी केली. चैत्रा सीबीएससी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत राज्यात सर्व विभागातून पहिली आलीय. दोन दिवसांपूर्वीच (13 मे) सीबीएससी बोर्डाचा निकाल लागला. त्यामध्ये तिनं 500 पैकी तब्बल 497 मार्क्स मिळवले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुलीनं डॉक्टर व्हावी अशी होती इच्छा
दहावीनंतर इंजिनिअर-डॉक्टर होण्यासाठी अनेक विद्यार्थी विज्ञान शाखेचा पर्याय निवडतात. वाणिज्य शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. दिवाण दांपत्य डॉक्टर असल्यानं लेकीनंही डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. पण चैत्रानं कला शाखा निवडली. मानसशास्त्रात रस असल्याने तिने कला विभागात पुढील।शिक्षण घेण्याचं ठरवलं. रोज 6 ते 7 तास तर काही वेळा 12 तासांपर्यंत अभ्यास करत तिनं हे यश मिळवलंय. कोणताही क्लास न लावता चैत्रा स्वत:च्या मेहनतीनं सीबीएससी बोर्डात राज्यात सर्व विभागातून पहिली आली आहे.
( नक्की वाचा : विदर्भातल्या शेतकऱ्याचा मुलगा JEE मेन्समध्ये देशात पहिला, जाणून घ्या यशाचं गुपित )
मुलीने कला शाखा निवडल्याने तिच्या करीअरची आई-वडिलांना चिंता होती. पण चैत्रानं त्यांना अभिमान वाटावी अशी कामगिरी केलीय. फोकस निश्चित असेल आणि त्यासाठी नियोजनबद्धपणे काम करण्याचं सातत्य असेल तर मोठं यश मिळवता येतं हे चैत्रानं दाखवून दिलं. या यशाबद्धल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.