दादरमधील 'चैतन्य' हॉटेल माहिती नाही असा मांसाहार प्रेमी मुंबईत तरी सापडणं थोडं मुश्कील आहे. हेच चैतन्य हॉटेल सध्या एका व्हायरल पोस्टमुळे चर्चेत आलं आहे. एका मराठी महिलेने सुरू केलेल्या या हॉटेलमध्ये जेवू नका असा सल्लावजा इशारा फेसबुक पोस्टमध्ये देण्यात आला आहे. महत्त्वाची बाब ही आहे की हा इशारा या हॉटेलच्याच सोशल मीडिया हँडलवरून देण्यात आला आहे. हा इशारा देत असताना या हॉटेलमध्ये का जेवू नये याची कारणेही देण्यात आली आहेत.
'चैतन्य अस्सल मालवणी भोजनगृह' बद्दल काय म्हटलंय पोस्टमध्ये
चैतन्य हॉटेलचं पूर्ण नाव चैतन्य अस्सल मालवणी भोजनगृह असं आहे (Chaitanya Assal Malvani Bhojangruh). त्यांचे एक फेसबुक पेज असून या पेजवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "आम्ही चैतन्यमध्ये जेवू नका असा सक्त ताकीद देत आहोत." यापोस्टमध्ये यामागची कारणे सांगताना म्हटलंय की, "कारण पहिले- एकदा इथली चव चाखलीत की ती चव तुम्ही विसरणे हे केवळ अशक्य आहे. इथला खेकडा मसाला, प्रॉन्स थाळी खाल्लीत किंवा इथली सोलकढी प्यायलीत की ही चव तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही याची खात्री पटेल. त्यामुळे तुम्ही ही जोखीम पत्करून इथे जेवू शकता. "ही पोस्ट खोचक आणि गंमतीदार पद्धतीने तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ती लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
कोण आहेत 'चैतन्य'च्या मालकीणबाई?
सुरेखा वाळके या 'चैतन्य अस्सल मालवणी भोजनगृह'च्या मालकीणबाई आहेत. एक ब्यूटी पार्लर चालविणाऱ्या सुरेखा वाळके यांनी 1994 साली मालवणात छोटी खानावळ सुरू केली होती. पुढे मुंबईला आल्यानंतर त्यांनी दादरमध्ये चैतन्य हॉटेल सुरू केले. मालवणी पद्धतीचे मांसाहारी पदार्थ मिळत असल्याने हे हॉटेल अल्पावधीत प्रसिद्ध झाले. दादरपाठोपाठ अंधेरीमध्येही 'चैतन्य' हॉटेल सुरू झाले आणि त्यानंतर दादरच्याच कोहीनूर स्क्वेअरमध्ये कोस्ट अँड ब्लूम नावाचे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले.