पोलिसांवर नेहमी आरोप होत असतात. ते कुठल्या ना कुठल्या कारणाने टिकेची धनी ही ठरतात. पण काही पोलिसांमुळे पोलिस विभागाचं नाव उंचावलं जातं. अशीच एक घटना चंद्रपूरात घडली आहे. इथं कर्तव्यावर असलेल्या एका महिला वाहतूक पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. त्यांच्या एका कृतीने एका पंधरा दिवसाच्या चुमकलीचा जीव वाचला आहे. पल्लवी सदनवार असं या महिला पोलिसाचं नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पल्लवी सदनवार या चंद्रपूर वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. नेहमी प्रमाणे त्या आपल्या कर्तव्यावर होत्या. त्याच वेळी रोहित साखरे यांच्या पंधरा दिवसाच्या मुलीला रक्ताची गरजी होती. या मुलीला काविळ झाली होती. अशा स्थिती तातडीने रक्त देणं आवश्यक होतं. शिवाय तो A + ब्लड ग्रुपही महत्वाचा होता. याची माहिती कर्तव्यावर असलेल्या पल्लवी यांना मिळाली. त्यावेळी त्यांनी सामाजिक बांधीलकीचं भान राखत रक्तदान करण्याचा निर्णय घेतला.
त्या थेट रुग्णालयात पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी रक्तदान केलं. त्यांनी केलेल्या रक्तदानामुळे एका 15 दिवसाच्या चिमुकलीचा जीव वाचला. त्यांनी केलेल्या मदतीने मुलीच्या नातेवाईकांनी पल्लवी यांचे आभार मानले. पोलिस विभागानेही याची दखल घेत पल्लवी यांच्या पाठिवर कौतूकाची थाप मारली आहे. रक्तदान केल्यानंतर पल्लवी या आपल्या कर्तव्यावर लगेच रुजू झाल्या. गरजेच्या वेळी त्या धावून आल्याने एका चिमुकलीला मात्र जिवनदान मिळालं हे मात्र नक्की.
वाहनचालकांना मार्गावर वाहतूक पोलीस नकोसे असतात. उगाच भुर्दंड नकोय म्हणून काही तर वाहतूक पोलीस दिसताच थेट मार्गच बदलतात. नेहमीच रस्त्यावरील रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी कर्तव्य बजावणारे हे पोलीस, सामाजिक आपत्ती किंवा आरोग्याच्या आणीबाणीच्या प्रसंगीही मदतीस धावून येतात, याचं हे ठळक उदाहरण ठरलं आहे. सदनवार यांच्या या तत्परतेमुळे केवळ पोलिस दलातच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेतही त्यांचं कौतुक होत आहे. सदनवार यांचं हे कार्य प्रेरणादायी ठरलं असून, अशा पोलीस कर्मचार्यांमुळेच समाजात माणुसकीचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.