मुंबई: "महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुर्नरचना विधेयक आणण्याचा प्रयत्न करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्राला संबोधण्याच्या नावाखाली देशातील जनतेला प्रचारकी थाटातील आपले भाषण ऐकवले. ३० मिनिटांच्या भाषणात मोदीजींनी ५८ वेळा काँग्रेसचे नाव घेतले आणि आपल्या नेहमीच्या सवयीने त्यांनी खोटे दावे केले"< अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली.
हर्षवर्धन सपकाळ यांचा PM मोदींवर पलटवार!
काँग्रेसने जनधन-आधार-मोबाईल (JAM) आणि जीएसटीला विरोध केला हा पंतप्रधानांचा दावा म्हणजे त्यांच्या खोटारडेपणाचे उत्तम उदाहरण आहे. २९ सप्टेंबर २०१० रोजी महाराष्ट्रातील नंदुरबार येथून आधारचा शुभारंभ पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह व सोनियाजी गांधी यांनी केला होता. GST सुद्धा डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस सरकारने पुढे नेला होता; मात्र त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असणा-या नरेंद्र मोदीजींनीच GST ला विरोध केला होता, असा आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
तसेच पंतप्रधानांनी माता भगिनींची माफी मागण्यापेक्षा आता लागलीच महिला आरक्षणाची अंमलबजावणी केली पाहिजे. महिला आरक्षणाचा कायदा नारी शक्ती वंदना तर सप्टेंबर २०२३ मध्ये काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांच्या मदतीने मंजूर झालेला आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणून देशाची निवडणूक संरचना बदलून संविधान आणि लोकशाही मोडीत काढण्याचा मोदी सरकारचे कुटील कारस्थान उघड झाले आहे, महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधान, लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर घाला घालण्याचा प्रयत्न करून तमाम महिलांची फसवणूक केल्याबद्दल नरेंद्र मोदींनी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे, असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
काय म्हणाले PM मोदी?
काल संसेदत महिला आरक्षणासंबंधीत विधेयकाला ज्या पक्षांनी विरोध दर्शवला, त्यांना मला एक सांगायचं आहे.लोक नारीशक्तीला हलक्यात घेत आहेत. ते विसरत आहेत की, 21 व्या शतकातील नारी नारी प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवते.यामुळे महिला आरक्षणाला रोखण्याचं जे पाप केलं आहे, याची शिक्षा नक्कीच मिळेल. आज भारताचा प्रत्येक नागरिक पाहत आहे की, कशाप्रकारे भारताच्या नारी शक्तीला रोखण्यात आलं. त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. आम्ही खूप प्रयत्न करूनही यशस्वी झालो नाहीत. यासाठी मी देशाच्या मात-भगिनींची माफी मागतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.