मुंबई: महायुती सरकारची लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील पात्र 8 लाख महिलांना 500 रुपयेच मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. महायुती सरकारच्या या निर्णयावरुन आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ही घोर फसवणूक आल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यातील 8 लाख महिलांना 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'अंतर्गत 1000 रुपये मिळत असल्याने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचा 1500 रुपयांचा मासिक हप्ता कमी करून फक्त 500 रुपये मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. "लाडकी बहीण योजनेचे नियम आधीचेच आहेत. जे इतर योजना लाभ घेतात त्यांना लाडकी बहीण योजना लाभ मिळणार नाही हे आधीच ठरलेलं. आम्ही फसवणार नाही, योजन चालूच ठेवणार आहे..' असं अजित पवार हे म्हणालेत.
''आमचं म्हणणं आहे कोणत्यातरी एकाच योजनेचा लाभ घ्यावा. जे केंद्राचे 1000 मिळतात ते मिळणारच आहेत. त्याचा राज्य सरकारशी काही संबंध नाही. जर असं काही असेल तर ती 500 रुपयांची योजना बंद करुन ती 1500 ची घ्यावी.. यापैकी कोणती योजना घ्यायची त्याचा निर्णय लाडक्या बहिणींवर आहे,'' असही ते म्हणालेत.
शरद पवार गटाची टीका!
मायभगिनींची घोर फसवणूक करणाऱ्या राज्य सरकारवर 420 चा फसवणुकीचा गुन्हा का दाखल करू नये? राज्यातील 8 लाख महिलांना 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'अंतर्गत 1000 रुपये मिळत असल्याने त्यांना मिळणारा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचा 1500 रुपयांचा मासिक हप्ता कमी करून फक्त 500 रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अन्यायकारक नाही का?
निवडणुकीपूर्वी 2100 रु. चा हप्ता देऊ अशी वल्गना करणारे महायुती सरकार आज 2100 रुपये तर सोडाच, पण मासिक 1500 रुपयेही वेळेवर देत नाही. याउलट ते अजून कसे कमी होतील यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधत आहेत. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ही घोर फसवणूक आहे.. असे म्हणत शरद पवार यांच्या पक्षाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे.