देवा राखुंडे, बारामती: इंदापुरमध्ये सध्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा आज बारामतीच्या डोरलेवाडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या सभेत जय भवानी माता पॅनलच्या प्रचाराच्या निमित्त अजित पवार कारखान्याच्या सभासदांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले अजित पवार?
"छत्रपती सहकारी साखर कारखाना हा 60% इंदापूर अंतर 40 टक्के बारामती तालुक्यात येतो. या कारखान्याच्या स्थापनेला आता जवळपास 68 वर्ष झाली. दोन पिढ्या गेल्या आता तिसरी पिढी आली. राजकीय जोडे बाजूला ठेवून हा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याचा विचार करा. विरोधी पॅनलमधील काही लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे. दत्तात्रय भरणे गेल्या तीन टर्म पासून इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे," असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
तसेच "ही निवडणूक आपल्या आर्थिक बाबीशी निगडित आहे. माळेगाव आणि सोमेश्वर कारखाना जसा भाव देतो तसा भाव छत्रपती कारखाना देत नाही. पूर्वी छत्रपती कारखाना चांगला भाव देत होता. अलिकडे आपला भाव घसरला हे मान्य करावे लागेल. तुम्ही माझ्या आणि पृथ्वीराज जाचक यांच्या हातात कारभार दिला नाही तरी माझी चूल पेटायची बंद होणार नाही आम्हाला 22 हजार सभासदांची अडचण दूर करायची आहे. सहकारात खातं आमच्याकडे आहे, आम्ही महायुतीचे घटक आहोत. मी कामाचा माणूस आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे," असे अजित पवार म्हणाले.
नक्की वाचा: तुरुंगातल्या आरोपीने सुचवले संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे नाव
"इंदापूर तालुक्यातील छत्रपती शिक्षण संस्थेला मी 25 कोटी देण्याचे कबूल केले आहे ते कुठून आणायचे काय आणायचे ते मी बघेल. केवळ कारखाना चालवण्यासाठी आम्ही मदत करणार नाही,तुमची इतर ही कामे असतात. कारखानदारांना जसे शिक्षण घेतलेली मुले पाहिजेत कशा पद्धतीचे शिक्षण देण्याचं काम आपण आता करत आहोत. विविध संस्थांवर आपण प्रत्येकाला संधी दिली आहे. माझ्या हातात अनेक संस्था आहेत ज्यांना आता संधी मिळाली नाही त्यांचा विचार तिथे करू.पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या निवडणुकीत काम करा. आपण सर्वजण वेगवेगळ्या विचारधारेचे आहोत पण ध्येय एकच आहे, असे आवाहनही अजित पवार यांनी मतदारांना केले.