Dhananjay Munde Health Update : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचं हत्याकांड संपूर्ण राज्यात गाजतंय. या प्रकरणात परळीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडला अटक झाली. धनंजय मुंडेवरही आरोप होत आहेत. या आरोपानंतर मुंडे यांना मंत्रिपद सोडावं लागलं.
या संपूर्ण गदारोळात धनंजय मुंडे प्रसिद्धी माध्यमं तसंच जाहीर कार्यक्रमापासून दूर आहेत. ते विधीमंडळ अधिवेशनात गैरहजर होते. तसंच पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यातही ते अनुपस्थितीत होते. धनंजय मुंडे यांनी स्वत: आपण आजारी असल्यानं पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात येऊ शकलो नाही, असं स्पष्टीकरण दिलं होतं. पण, त्यानंतरही त्यांच्या आजारावर उलट-सुलट चर्चा सुरुच होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी मुंडे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिल. धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आला होता, असं पाटील यांनी सांगितलं. बाबासाहेब पाटील यांनी नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
बाबासाहेब पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यावर स्वत: धनंजय मुंडे यांनी ट्विट करत त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे.
आमचे सहकारी, सहकारमंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.
( नक्की वाचा : काँग्रेसला प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच बसणार हादरा! बडा नेता साथ सोडणार? )
श्री बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार.
मात्र मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे व त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असून बोलायला त्रास आहे. मात्र नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही.
काय म्हणाले होते पाटील?
यापूर्वी बाबासाहेब पाटील यांनी नांदेडमध्ये बोलताना सांगितले होते की, धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नाही. त्यांना अर्धांगवायूचा झटका आला असून डोळे देखील वाकडे झाल्याचं पाटील यांनी सांगितलं. ते आमच्या पक्षाच्या बैठकांना मुंबईमध्ये येतात. जवळच्या व्यक्तींनी आग्रह केला तर काही कार्यक्रमांना जातात.
नामदेव शास्त्रींनी दिली होती माहिती
यापूर्वी, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या गालावरुन वारं गेलं असल्याची माहिती दिली होती. मुंडे यांची चांगली वाणी बंद पडली. ती पुन्हा सुरु व्हावी यासाठी सगळ्यांनी मिळून भगवानबाबांना प्रार्थना करा, असं आवाहन नामदेव शास्त्रींनी केलं होतं.