दिवाकर माने, प्रतिनिधी
Dhananjay Munde News : नगर परिषद निवडणुकीतील प्रचाराच्या रणधुमाळीत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याबाबत एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. गुट्टे यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
धनुभाऊ, तुमचा मर्डर झाला असता...'
आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांना थेट इशारा देत म्हटले आहे की, "धनुभाऊ, तुमचा इंदूरमध्ये मर्डर झाला असता. पण भय्यूजी महाराजांनी तुम्हाला वाचवलं. तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हे देखील आम्हाला माहिती आहे, पण आताच सगळं काढणार नाही." अशा शब्दात गुट्टेंनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे.
यापूर्वी, धनंजय मुंडे यांनी गंगाखेड येथे त्यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे यांच्या प्रचारसभेत बोलताना रत्नाकर गुट्टे यांच्यावर सडकून टीका केली होती आणि त्यांचा उल्लेख थेट 'नीरव मोदी' असा केला होता.
'तुम्ही तर विजय माल्ल्या आहात'
धनंजय मुंडे यांच्या 'नीरव मोदी' टीकेला रत्नाकर गुट्टे यांनीही त्याच भाषेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "तुम्ही मला नीरव मोदी म्हणालात. पण तुम्ही तर विजय माल्ल्या आहात," असा खोचक टोला गुट्टे यांनी लगावला. इतकेच नव्हे तर, माल्ल्या आणि मुंडे यांच्या आवडी-निवडी सारख्याच असल्याचा उपरोधिक उल्लेखही त्यांनी केला.
( नक्की वाचा : धनंजय मुंडेंच्या जवळच्या व्यक्तीनं रेल्वेसमोर उडी मारत दिला जीव, अकोल्यात खळबळ! कारण काय? )
गुट्टे यांनी मुंडे यांना गंभीर इशारा देताना म्हटले आहे की, "तुम्ही गंगाखेडला आलात आणि माझ्याविरोधात बोललात. आता तुमच्या विरोधात बोलल्याशिवाय राहणार नाही. तुमचं सगळंच बाहेर काढणार," असा इशाराच रत्नाकर गुट्टे यांनी दिलाय.
पंकजा मुंडे यांची भूमिका काय?
दरम्यान, रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा मोठा दावा केल्यानंतर यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. "माझ्याकडे नकारात्मक गोष्टी येत नाहीत, त्यामुळे मी यावर बोलणार नाही," असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
( नक्की वाचा : Ambernath News: अंबरनाथमध्ये मोठा ट्विस्ट! निवडणूक स्थगितीवरून शिवसेना आक्रमक; पण भाजपानं दाखवलं 'ते' पत्र )
एकंदरीत, गंगाखेडमध्ये बहीण उर्मिला केंद्रे यांच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी रत्नाकर गुट्टे यांच्यावर केलेल्या आरोपांना गुट्टे यांनी त्याच भाषेत उत्तर दिले आहे. मात्र, इंदूरमध्ये धनंजय मुंडेंची हत्या झाली असती, पण भय्युजी महाराजांमुळे ते वाचले, या खळबळजनक दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.