भारतीय सैन्यात सेवा दिलेला सैनिक जर आपलं भारतीय नागरिकत्व रद्द करा अशी मागणी करत असेल तर? तुम्हालाही हे ऐकून धक्का बसला असेल ना. पण हे खरं आहे. भारतीय सैन्यात काम केलेल्या सैनिकाने अशी मागणी केली आहे. शिवाय या मागणीसाठी त्याने आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तिथे त्याने निवेदन देत नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली. त्याने ही मागणी का केली? या मागेही एक मोठी घडामोड कारणीभूत ठरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चंदू चव्हाण या जवानाचं नाव सर्वांनाच माहित असेल. हा मुळचा धुळे जिल्ह्यातील आहे. याच चंदू चव्हाण यानं भारत पाकिस्तान सीमेवर तैनात असताना भारतीय हद्द क्रॉस करत पाकिस्तानात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. शिवाय तो 3 महिने 21 दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होता. भारत सरकारने केलेल्या प्रयत्नानंतर त्याला सोडून देण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली होती. ज्या वेळी तो धुळ्यात परत आला होता त्यावेळी त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं.
मात्र पाकिस्तानातून सुटण्याचा त्याचा आनंद जास्त काळ राहीला नाही. त्याला सैन्यदलातून बडतर्फ करण्यात आलं. या निर्णयाने चंदू चव्हाण याला मोठा धक्का बसला. हा आपल्यावर अन्याय असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या विरोधात त्यांना आवजही उचललाय सध्या त्यांनी न्याय यात्राही सुरू केली आहे. सैन्य दलातून आपल्याला बडतर्फ केल्याने आपल्याला खाजगी ठिकाणीही नोकरी मिळत नाही अशी आपली स्थिती झाली आहे. देशसेवा करणं आपल्या मनात होतं. पण भलतचं घडल्याचंही ते म्हणाले.
आपल्याला सरकार नोकरीतही घेत नाही. बाहेर कुठे नोकरीही मिळत नाही. आपण जगायचं कसं? कुटुंबाला सांभाळायचं तरी कसं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. जर सरकार आपल्याला नोकरी देवू शकत नसेल तर आपले भारतीय नागरिकत्व तरी रद्द करावे अशी मागणीही त्यांनी केले आहे. शिवाय तसं एक निवेदन ही त्यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. आपल्यावर जी कारवाई झाली ती अन्यायकारक आहे. आपण नोकरी नसल्याने सध्या कर्जबाजारी झालो आहोत. शिवाय सैन्यदलाची पेन्शनही अजून सुरु झालेली नाही. त्यामुळे आर्थिक स्थिती पुर्ण पणे खालावली आहे असंही त्याचं म्हणणं आहे.