Mumbai To Alibaug Ferry News: मुंबईकरांचे हक्काचे पिकनिक स्पॉट असलेल्या अलिबागला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या २६ मे पासून गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यानची जलवाहतूक बंद होत आहे. पावसाळ्यातील वादळी वारे आणि समुद्राची स्थिती पाहता ३१ ऑगस्टपर्यंत ही सेवा स्थगित ठेवण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई- मांडवा जलवाहतूक बंद
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पावसाळ्यातील संभाव्य चक्रीवादळे आणि खवळलेल्या समुद्रामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक २६ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला आहे. दरवर्षी मान्सून सुरू होण्यापूर्वी ही सेवा बंद केली जाते. यामुळे पर्यटकांना आता रस्ते मार्गाने किंवा महागड्या रो-रो फेरीने प्रवास करावा लागणार आहे.
गेटवे ते मांडवा मार्गावरील पीएनपी, मालदार, अजंठा या बोटी आता थेट सप्टेंबर महिन्यातच पुन्हा समुद्रात उतरतील. रस्ते मार्गाने प्रवास करताना प्रवाशांना अटल सेतूचा पर्याय उपलब्ध आहे.परंतु पेण-वडखळ आणि कार्लेखिंड येथील नेहमीची वाहतूक कोंडी प्रवाशांचा वेळ खाऊ शकते. मुंबईहून अवघ्या दीड तासात अलिबाग गाठणे आता जलमार्गाअभावी कठीण होणार असून, पावसाळी सहलींचे नियोजन करणाऱ्यांना रस्ते प्रवासाचा जास्तीचा वेळ गृहीत धरावा लागणार आहे.
IAS Transfer: IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचा धडाका, पुण्यातील कारभारी बदलले; 4 अधिकाऱ्यांची निघाली ऑर्डर
सागरी मंडळाच्या या निर्णयामुळे पीएनपी, मालदार आणि अजंठा या कंपन्यांच्या बोटी किनाऱ्याला उभ्या राहणार आहेत. भाऊचा धक्का ते रेवस ही सेवाही बंद राहणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. सध्या रो-रो फेरी सुरू असली तरी तिचे वाढलेले दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. अशातच रस्ते मार्गाची अवस्था बिकट असून प्रवाशांना वडखळ आणि पोयनाडच्या ट्रॅफिक जामचा सामना करावा लागणार आहे.