Girgaon Gudi Padwa 2026: आज गुढीपाडवा. राज्यासह देशभरात गुढी पाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये विशेषत: गिरगावमध्ये भव्य शोभायात्रा आयोजित केल्या जातात. या शोभा यात्रेमध्ये मुंबईकर मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. गिरगावच्या या शोभा यात्रेमध्ये लक्ष वेधून घेणारी बुलेटराणी म्हणजेच डॉ. अपर्णा बांदोडकर. 2013 पासून या शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या अपर्णा बांदोडकर यांनी गिरगावच्या या गुढी पाडवा उत्सवाचे महत्त्व समजावून सांगत हिंदू संस्कृती आणि विज्ञानाचा संबंध अधोरेखित केला आहे.
भारतीय सण आणि विज्ञान...
"आपले भारतीय सण खूपच विज्ञानवादी आहेत. प्रत्येक सणाला शास्त्रीय कारण आहे. भारतीय सणांना असलेला शास्त्रीय आधार आणि त्यांचे महत्त्व युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे नववर्षाची सुरुवात आणि चैत्र नवरात्रीचा प्रारंभ. निसर्गातील बदलांचा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते. गुढी पाडवा म्हणजे चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेचा पहिला दिवस" असं सांगत अपर्णा बांदोडकर यांनी पाडव्याचे महत्त्व सांगितले.
तसेच "वसंत ऋतूत निसर्गात होणारे बदल सुरु झाले की आपण शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात करतो. नवीन पालवी आणि फुलांचा बहर हे सर्व देवी शक्तीचे म्हणजेच प्रकृतीचे रूप आहे. आपल्या भारत मातेची प्रतिमा ही या शक्तीचेच प्रतीक आहे. ऋग्वेद आणि विष्णू पुराणातही भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक अस्तित्वाचे दाखले मिळतात. हिमालयापासून समुद्रापर्यंत पसरलेला हा देश आणि येथील आपण सर्व भारतीय आहोत, ही भावना दृढ करणे आवश्यक आहे", असही त्या म्हणाल्या.
नव्या पिढीसाठी स्तुत्य उपक्रम..
"प्राचीन धर्मग्रंथांमध्ये 'भारतवर्ष' असा उल्लेख आढळतो. विष्णू पुराणातील (2.3.1) श्लोकानुसार, समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला जो देश स्थित आहे, तो 'भारत' असून येथील प्रजेला 'भारतीय' असे संबोधले जाते. हा सण साजरा करण्यामागे नवीन पिढीला आपल्या सनातन धर्माचा इतिहास आणि विज्ञानाची ओळख करून देणे हा मुख्य उद्देश आहे"
ठनिसर्ग म्हणजेच आदिमाया आदिशक्ती असून, भारतमातेचे स्वरूपही शक्तीच्या रूपात पुजले जाते. गिरगाव येथील गुढीपाडवा उत्सवाच्या माध्यमातून हाच वारसा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. गिरगाव गुढी पाडव्याद्वारे आपल्या नवीन पिढीला आपल्या इतिहासाची, सनातन धर्माविषयी व आपल्या शास्त्र व सणांविषयी आणखी माहिती व्हावी हा माझा एकमेव उद्देश आहे, असं अपर्णा बांदोडकर यांनी सांगितले आहे.