Kartik Vajir Bhorya Viral Speech: भारतीय स्वातंत्र्य दिन आज मोठ्या उत्साहात पार पडत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यभरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. अशातच स्वातंत्र्यदिनानिमित्त जालन्याच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या भोऱ्या उर्फ कार्तिक वजिरने केलेल्या भाषणाची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. नेहमीप्रमाणेच या चिमुकल्याने आपल्या भाषणातून राजकीय नेत्यांना टोले लगावत आत्म परिषण करायला लावणारे मुद्दे मांडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याने माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवर निशाणा साधला आहे.
काय आहे कार्तिकचे भाषण?
"आज आपला 79 वा स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्यदिन म्हणलं की आपल्याला सुचते, मी हे करु शकतो. मी ते करु शकतो मात्र आपण आपल्या जबाबदाऱ्या विसरतो. स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाने खूप प्रगती केली. सुईला छिद्र पाडता येत नव्हते आता चंद्रावर पाऊल ठेवले आहे. विज्ञान, तंत्रज्ञान शेतीची भरभराट चालली आहे, पण गरीब- श्रीमंत दरीही वाढत आहे, असं तो म्हणाला.
तसेच धनदांडगे लोक गरिबांना लुटत आहेत. राजकारणी शेतकऱ्याला चिरडत आहेत. आपण निवडलेला नेता विधानसभेत रमी खेळतो. तरी त्याला याचे काही वाटत नाही. शेतकरी लाखो रुपये टाकतात. प्रामणिकपणे राबराब राबतात मात्र आमचा मंत्री प्रश्न सोडवायचे सोडून विधानसभेत पत्ते खेळतो. किती दुर्दैव आमचं! तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले ते स्वाभिमानी जगण्यासाठी. पैशासाठी आणि सत्तेपुढे लाचारी करु नये. खोट्याला खोटे म्हणा आणि स्वाभिमानाने जगा, असा मोलाचा सल्लाही त्याने दिला आहे.
दरम्यान, कार्तिक वजीर उर्फ भोऱ्या हा रेवलगावच्या जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकतो. गेल्या काही वर्षांपासून त्याची, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाच्या भाषणांची तुफान चर्चा होत असते. आपल्या दमदार वाणीतून हा चिमुकला ज्वलंत मुद्द्यांवर बोलता तसेच सत्ताधाऱ्यांवर, राजकीय नेत्यांवरही तुटून पडतो. त्याच्या या भाषणाचे, धाडसाचे अन् खास वक्तृत्व शैलीचे जोरदार कौतुक होत आहे.
जीएसटी ते जेट इंजिन... PM मोदींच्या लाल किल्ल्यावरून देशवासियांसाठी 8 मोठ्या घोषणा