अमोल सराफ, प्रतिनिधी
Indian Railway News: रेल्वेचे कन्फर्म तिकीट खिशात असूनही एखाद्या प्रवाशाला रात्रभर उभ्याने प्रवास करावा लागला, तर रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथील एका प्रवाशाला रेल्वे कर्मचाऱ्याच्या एका छोट्याशा चुकीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पैसे मोजून आणि आरक्षित तिकीट असूनही या प्रवाशाचा शेगाव ते मुंबई हा प्रवास अत्यंत त्रासदायक ठरला.
काय आहे प्रकरण?
खामगाव येथील रहिवासी कुणाल सोनले आणि मोहम्मद फरहान यांनी 24 जानेवारी 2026 रोजी मुंबईला जाण्यासाठी विदर्भ एक्सप्रेसचे तात्काळ तिकीट काढले होते. त्यांनी 23 जानेवारी रोजी खामगाव रेल्वे स्टेशनवरील काउंटरवर जाऊन रितसर अर्ज भरून दिला होता. मात्र, तिकीट बुक करताना रेल्वे कर्मचाऱ्याने मोहम्मद फरहान यांच्या नावासमोर लिंग नोंदवताना मोठी चूक केली. पुरुष (Male) ऐवजी तिथे महिला (Female) अशी नोंद करण्यात आली. कर्मचाऱ्याच्या या एका चुकीच्या टायपिंगमुळे प्रवाशाच्या अडचणीत वाढ झाली.
एसी थ्री टायरचे तिकीट असूनही सीट नाकारली
विदर्भ एक्सप्रेस साधारणपणे रात्री 9:30 च्या सुमारास शेगाव स्थानकावर येते. मोहम्मद फरहान यांनी एसी थ्री टायरचे तात्काळ तिकीट काढले होते, ज्यासाठी त्यांनी जास्तीचे पैसेही मोजले होते. प्रवासादरम्यान जेव्हा टीसी (TC) तिकीट तपासण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी तांत्रिक कारण पुढे करत फरहान यांना सीट देण्यास नकार दिला.
तिकिटावर महिला अशी नोंद होती, तर फरहान यांच्याकडे असलेले ओळखपत्र पुरुषाचे होते. हा तांत्रिक बदल असल्याने नियमावर बोट ठेवून रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना आरक्षित जागा वापरू दिली नाही.
( नक्की वाचा : Pune News : हिंजवडी ते शिवाजीनगर फक्त काही मिनिटांत! पुणेकरांनो वाचा तुमच्या घराखालून कधी धावणार Metro 3? )
रात्रभर जागून शेगाव ते मुंबई प्रवास
शेगाव ते मुंबई दादर हा प्रवास साधारणपणे 8 ते 9 तासांचा आहे. गाडी पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान मुंबईला पोहोचते. हा संपूर्ण प्रवास रात्रीचा असल्याने प्रवाशांना आरामाची गरज असते. मात्र, सीट नाकारल्या गेल्यामुळे मोहम्मद फरहान यांना संपूर्ण रात्र उभ्याने किंवा बसून जागून काढावी लागली. कन्फर्म तिकीट हातात असूनही त्यांना वेटिंग लिस्टप्रमाणे किंवा त्यापेक्षाही वाईट परिस्थितीत प्रवास करावा लागला. रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे एका प्रवाशाला हा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे.
काय कारवाई होणार?
हा सर्व प्रकार खामगाव येथील बुकिंग काउंटरवरील क्लर्कच्या चुकीमुळे घडला आहे. आता अशा चुका करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर रेल्वे प्रशासन काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कदाचित रेल्वे प्रशासन तिकिटाचे पैसे परत करेलही, पण प्रवाशाने जो मनस्ताप सहन केला आणि जी रात्र त्रासात घालवली, त्याची भरपाई कशी होणार? या घटनेमुळे आता प्रवाशांनीही सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. रेल्वे काउंटरवरून तिकीट घेतल्यावर त्यावर आपली माहिती, वय आणि लिंग योग्य रितीने नोंदवले आहे की नाही, हे तपासून पाहणे गरजेचे झाले आहे.