मंगेश जोशी, जळगाव: राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. गिरीश महाजन यांच्या डोक्यावर रॉड पडल्याने ते जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जळगावमधील वरणगाव येथील शहीद अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना हा प्रकार घडला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरणगाव येथील शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आज वरणगाव शहरात दाखल झाले होते. शहिद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे मिलिटरीच्या ट्रकमध्ये उंचावर उडी मारून चढले, मात्र याचवेळी ट्रकवरचा रॉड त्यांच्या डोक्याला लागला. डोक्याला जोरदार मार बसल्याने रक्तस्राव झाला तसेच क्षणभर गिरीश महाजन यांना चक्कर आली.
डोक्याला रॉड लागून मोठा रक्तस्त्राव झाल्याने तसेच चक्कर आल्याने गिरीश महाजन यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. यावेळी कार्यकर्ते तसेच डॉक्टरांची चांगलीच धावपळ झाली. रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर गिरीश महाजन हे तातडीने एका महत्त्वाच्या बैठकीसाठी नाशिकसाठी रवाना झाले.