मंगेश जोशी, प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरात असलेल्या जे. ई. स्कूलमध्ये शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थ्यांचा शाळेच्या मैदानात मित्रांसोबत खेळल्यानंतर अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चैतन्य शंकर मराठे रा. मुंढोळदे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नसून हृदयविकाराच्या झटक्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळदे येथील चैतन्य शंकर मराठे हा 13 वर्षीय विद्यार्थी मुक्ताईनगर मधील जे. ई.स्कूल मध्ये इयत्ता सातव्या वर्गात शिकत होता. बुधवारी (30 जुलै) नेहमीप्रमाणे चैतन्य हा सकाळी शाळेच्या बसने शाळेत आला होता. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत डबा खाल्ल्यानंतर चैतन्य हा मित्रांसोबत शाळेच्या मैदानात खेळत होता. खेळताना काही वेळाने चैतन्यने पाणी पिले. त्यानंतर शाळेच्या मैदानातील बाकावर तो बसला , मात्र त्याच क्षणी चैतन्य हा अचानक कोसळल्याने इतर विद्यार्थ्यांनी याबाबत शिक्षकांना माहिती दिली.
( नक्की वाचा : विद्यार्थ्याचं अक्षर खराब म्हणून संतापली शिक्षिका, अशी दिली शिक्षा की वाचून उडेल थरकाप )
शिक्षकांनी तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र तपासाअंती डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच चैतन्य चे कुटुंबीय व नातेवाईकांनी तात्काळ मुक्ताईनगर मध्ये धाव घेतली व शाळेत मृतअवस्थेत मुलाला पाहून चैतन्याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.
चैतन्य च्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून चैतन्यचा मृतदेह मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे. दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने चैतन्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज हा वर्तवण्यात येत असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर नेमके मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
चैतन्यच्या पश्चात आई वडील आणि मोठा भाऊ असं कुटुंब असून चैतन्याच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच मुंढोळदे गावावर ही शोककळा पसरली असून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.