देवा राखुंडे, प्रतिनिधी
Baramati Nagar Parishad: बारामतीच्या राजकारणात सध्या एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ते नाव आहे बहुजन समाज पार्टीचे (BSP) महाराष्ट्र राज्याचे महासचिव काळूराम चौधरी यांचे. त्यांनी बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदारांना जे आश्वासन दिले आहे, त्यामुळे केवळ बारामतीच नाही, तर संपूर्ण राज्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. बारामतीकरांनी त्यांना संधी दिली, तर ते प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 10,000 रुपये देतील आणि मागेल त्याला 1BHK घर उपलब्ध करून देतील, असे भव्य आश्वासन त्यांनी दिले आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज दाखल झाला. मतदारांना इतकं मोठं स्वप्न दाखवणारे आणि पवार कुटुंबाच्या राजकारणाला सातत्याने आव्हान देणारे हे काळूराम चौधरी नेमके कोण आहेत? चला जाणून घेऊया त्यांचा प्रवास...
कोण आहेत काळूराम चौधरी?
काळूराम चौधरी हे बहुजन समाज पक्षाचे (BSP) महाराष्ट्र राज्याचे महासचिव आहेत. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राजकारणापलीकडे त्यांची ओळख एक लढवय्या सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही आहे.
बारामतीमध्ये त्यांचा उल्लेख माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांसह संपूर्ण पवार कुटुंबाचे 'राजकीय विरोधक' म्हणून केला जातो. बारामतीच्या राजकारणाला अनेक वर्षांपासून ते आव्हान देत आले आहेत.
( नक्की वाचा : Baramati News: बारामतीकरांना बंपर ऑफर! '10 हजार रुपये रोख आणि मागेल त्याला 1BHK घर, वाचा काय आहे प्रकार? )
पवार कुटुंबाच्या विरोधात लढलेल्या निवडणुका
काळूराम चौधरी यांनी बारामतीमध्ये पवार कुटुंबाच्या विरोधात अनेकदा लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक लढवली आहे. त्यांनी 2004, 2009 आणि 2014 या साली बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बहुजन समाज पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. तसेच, 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली.
विशेष म्हणजे, या लोकसभा निवडणुकीत त्यांना 30,000 हून अधिक मते मिळाली होती, ज्यामुळे बारामतीच्या राजकारणात त्यांची दखल घेतली गेली. त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे मोठे आश्वासन याच राजकीय जिद्दीचा भाग मानले जात आहे.
सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख
काळूराम चौधरी हे केवळ राजकारणी नसून बारामतीमधील विविध प्रश्नांवर आवाज उठवणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. बारामती शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या विरोधात त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी शहरात झालेल्या डंपरच्या अपघातानंतर त्यांनी आवाज उठवल्यामुळेच, पोलीस प्रशासनाने दिवसा अवजड वाहनांना शहरातून प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, शहरातील पथविक्रेत्यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने शासन दरबारी लावून धरले आहेत. सामाजिक प्रश्नांवरील त्यांची ही सक्रियता त्यांना सामान्य मतदारांशी जोडून ठेवणारी ठरली आहे.
वयाच्या 17 व्या वर्षापासून समाजसेवेला सुरुवात
काळूराम चौधरी यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास अगदी तळातून सुरू झाला आहे. त्यांचे शिक्षण 10वी पर्यंत झाले असून, त्यांनी बारामतीमधील शाहू हायस्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षांपासूनच समाजसेवेला सुरुवात केली. अवघ्या 18व्या वर्षी त्यांची बहुजन समाज पक्षाकडून बारामती विधानसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. 1999 मध्ये बारामती नगर परिषदेची पोटनिवडणूक लढवून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची औपचारिक सुरुवात केली.
या अनुभवातून पुढे त्यांना पुणे जिल्हा कोषाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य, प्रदेश सचिव अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवण्याची संधी मिळाली. सध्या त्यांच्याकडे राज्याच्या महासचिव पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे आणि ते पक्षाचे 'स्टार प्रचारक' म्हणूनही सर्व दूर परिचित आहेत. राजकीय आणि सामाजिक कामासोबतच त्यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे, जी ते स्वतः कसतात. त्यांची पत्नी अर्चना चौधरी या स्वस्त धान्य दुकान चालवतात.