कल्याण ते लातूर आता अवघ्या 4 तासांत!35 हजार कोटींचा नवा एक्सप्रेसवे होणार तयार, वाचा सविस्तर

Mumbai to Latur in 4 Hours: मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे आणि कल्याण परिसराला थेट मराठवाड्याशी जोडणाऱ्या कल्याण-लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला राज्य सरकारनं मान्यता दिलीय. 

जाहिरात
Read Time: 2 mins
या प्रकल्पामुळे कल्याण ते लातूर प्रवासाचा वेळ 10 ते 11 तासांवरून थेट 4 तासांवर येणार आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Mumbai to Latur in 4 Hours: मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे आणि कल्याण परिसराला थेट मराठवाड्याशी जोडणाऱ्या कल्याण-लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला राज्य सरकारनं मान्यता दिलीय.  6 पदरी आणि पूर्णपणे ॲक्सेस कंट्रोल्ड असलेला हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे मुंबई महानगर प्रदेशाला थेट लातूरशी जोडणार आहे. या 442 किलोमीटर लांबीच्या एक्सप्रेसवेसाठी सुमारे 35000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे कल्याण ते लातूर प्रवासाचा वेळ 10 ते 11 तासांवरून थेट 4 तासांवर येणार आहे.

8 किलोमीटर लांबीचा बोगदा

या एक्सप्रेसवेच्या मार्गात येणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील माळशेज घाटात तब्बल 8 किलोमीटर लांबीचा भव्य बोगदा तयार केला जाणार आहे. यामुळे वाहनचालकांना घाटातील धोकादायक, वळणावळणाच्या रस्त्यांपासून आणि वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. 

Advertisement

हा एक्सप्रेसवे ठाणे, कल्याण, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना थेट जोडणार आहे. या प्रकल्पाचे अलाइनमेंट पूर्ण झाले असून अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला आहे.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेचा विरार-JNPT लिंक हा कल्याण आणि बदलापूरजवळून जातो. त्यामुळे कल्याण-लातूर एक्सप्रेसवे थेट या लिंक एक्सप्रेसवे आणि रिंग रोड नेटवर्कशी जोडला जाईल. त्यामुळे लातूर आणि मराठवाड्यातून थेट दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेपर्यंत वाहनांची ये-जा सुलभ होणार असून, जेएनपीटी बंदरापर्यंत विनाअडथळा मालवाहतूक करणे शक्य होणार आहे.

विरार-अलिबाग कॉरिडॉर आणि विमानतळाशी जोडणी

कल्याण-लातूर एक्सप्रेसवे हा कल्याण आणि ठाणे भागात उभारल्या जाणाऱ्या विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरला थेट जोडला जाणार आहे. यामुळे नवी मुंबई, वसई-विरार, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू (MTHL) पर्यंत वेगाने पोहोचता येईल. तसेच मुंबईचे दूरवरचे भाग जसे की वसई आणि विरार हेदेखील या महामार्गाच्या जाळ्याशी जोडले जातील.

शक्तिपीठ आणि सूरत-चेन्नई एक्सप्रेसवेशी इंटरचेंज

लातूरच्या टोकाला या एक्सप्रेसवेचे इंटरचेंज नागपूर-गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवेशी होणार आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि गोवा यांच्यात हायस्पीड कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे. याशिवाय मराठवाड्यात हा रस्ता निर्माणाधीन सूरत-चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉरजवळून जाणार असल्याने दक्षिण भारताकडे जाणाऱ्या वाहनांना सहजरीत्या मार्ग बदलता येईल.

Advertisement

हा नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे सध्याच्या NH-61 (कल्याण-अहमदनगर-नांदेड हायवे) ला समांतर असणारा हायस्पीड कॉरिडॉर ठरेल. हा महामार्ग कल्याण, मुरबाड, माळशेज घाट (8 किमी टनल), ओतूर (आळेफाटा), अहिल्यानगर, पाथर्डी, बीड, मांजरसुंबा, अंबाजोगाई मार्गे लातूरला पोहोचेल. भविष्यात या महामार्गाचा विस्तार महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बिदर आणि गुलबर्गा मार्गापर्यंत करण्याचा प्रस्ताव आहे.