संकेत कुलकर्णी, पंढरपूर
DCM Kartiki Ekadashi Mahapuja 2025: कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर या दांपत्याला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची महापूजा करण्याचा बहुमान मिळाला. (Pandharpur Kartiki Ekadashi 2025)
विशेष म्हणजे यंदा जिल्हा परिषदेच्या शाळेतील 2 विद्यार्थ्यांनाही पूजा करण्याचा मान यंदा प्रथमच देण्यात आला. विशेष म्हणजे आषाढी नंतर कार्तिकी अशा दोन्ही एकादशीला महापूजा करणारे एकनाथ शिंदे हे मानकरी ठरले आहेत. शिंदे यांनी आपला मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश यांच्या समवेत विठ्ठलाची पूजा केली. कार्तिकी एकादशीच्या महापूजेनंतर राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे. बळीराजाला सुखी कर. महाराष्ट्र राज्य पहिल्या नंबरवर येऊ दे. असे साकडे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाकडे घातले.
नक्की वाचा: 'शून्य' विरुद्ध 'भरपूर' कामे; खासदार लंकेंवर 2 टक्क्यांवरून विखेंनी साधला निशाणा
तसेच आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही एकादशीना महापूजा करायला मिळाली. हे आमचे भाग्य आहे. देवाच्या आशीर्वादानुसार आपण मस्तक ठेवत असतो. यापुढेही विठोबाचा आशीर्वाद राहू दे. आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे साहेब यांना ताकद विठ्ठल देणार आहे. म्हणूनच कार्तिकीची महापूजा मिळाली. तर आषाढी वारीची विठोबाची शासकीय महापूजा करायला आपणास निश्चित आवडेल. अशी इच्छा एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी व्यक्त केली.
पंढरपूरची चंद्रभागा नदी वारकऱ्यांची पवित्र गंगा आहे ही चंद्रभागा कायमस्वरूपी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून नगर विकास खात्याने चंद्रभागा प्रदूषण मुक्तीसाठी 120 कोटी रुपयांचा निधीतून पहिल्या टप्प्यातील कामे सुरू आहे. यामधून पंढरपूर शहरांमध्ये ड्रेनेजसह महिला मिश्रित येणारे पाणी बंद केले जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात दिली.
दरम्यान, जोपर्यंत हातपाय चालू आहेत. तोपर्यंत पंढरपूरची वारी करायची इच्छा आहे. विठ्ठल आणि सारं काही दिल. आता मात्र पाऊस थांबू दे. आयुष्यात कधी वाटलं ही नव्हतं हे विठ्ठलाची महापूजा आपल्या हातून घडेल. अशी प्रतिक्रिया मानाचे वारकरी रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर यांनी दिली. महापूजेनंतर मानाचे वारकरी असणारे वालेगावकर दांपत्याला अश्रू अनावर झाले होते.