- KDMC Mayor: 3 3 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर निवडला जाणार
- अडीज वर्षांसाठी महापौर निवडला जाणार
- पहिला महापौर शिवसेनेचाच होण्याची दाट शक्यता
कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर आणि उपमहापौरपद हे अडीच वर्षांसाठी असणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने महापौर आणि उपमहापौरपदासाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची जाहिरात प्रसिद्ध केली असून या जाहिरातीमुळे हा फॉर्म्युला समोर आला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे 53 तर भाजपचे 50 नगरसेवक जिंकून आले आहेत. मनसेच्या 5 नगरसेवकांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. 4 अपक्ष आणि काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मिळून 3 नगरसेवकांनीही शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शिवसेनेने आपली ताकद 65 पर्यंत वाढवली आहे.
नक्की वाचा: कल्याण-डोंबिवलीत महापौर शिवसेनेचाच होणार,आरक्षणासाठीच्या लॉटरीमुळे चित्र झाले
कोण होणार कल्याण-डोंबिवलीचा महापौर आणि उपमहापौर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी मंगळवार, दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका सचिव कार्यालयाने या संदर्भात अधिकृत नोटीस जारी केली असून, निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. ही विशेष सभा कल्याण (पश्चिम) येथील शंकरराव चौक स्थित महापालिका भवनातील 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहात' दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल (पीठासीन अधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल. महायुतीमध्ये शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असल्याने पहिला महापौर हा शिवसेनेचाच बसेल असे सांगण्यात येत आहे. पुढील अडीच वर्षांसाठी भाजपचा महापौर बसण्याची शक्यता आहे. महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेला कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये कोणती पदे मिळतात याचीही उत्सुकता आहे.
नक्की वाचा: 'शिसारी आलीय...'; कल्याण-डोंबिवलीतील प्रकारावर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
असा आहे महापौर निवडणुकीसाठीचा कार्यक्रम
- अर्ज दाखल करणे- 29 जानेवारी ते 30 जानेवारी 2026
- अर्ज दाखल करण्यासाठी वेळ- सकाळी 11 ते सायंकाळी 5.30
- निवडणूक प्रक्रिया- 3 फेब्रुवारीला सभा सुरू झाल्यानंतर अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर 15 मिनिटांचा वेळ उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दिला जाईल.
- मतदान पद्धत- उमेदवारांची नावे घोषित केल्यानंतर 'हात उंचावून' (Open Voting) मते मोजली जातील आणि त्यानंतर पीठासीन अधिकारी निकाल जाहीर करतील.
आधी महापौर पदाची निवड होईल आणि त्यानंतर त्याच पद्धतीने उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया राबवली जाईल असे कल्याण-डोंबिवली महापालिका सचिव कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे.
नक्की वाचा: मनसेनं केडीएमसीत शिंदेंना दिलेल्या पाठिंब्याचं 'राज' काय? वाचा इनसाइड स्टोरी