- कोल्हापूरच्या बालिंगा येथील सेंटरवर गर्भलिंग निदान रॅकेट संदर्भात मोठी कारवाई
- छापेमारीत गर्भलिंग निदानासाठी वापरली जाणारी मशिन, औषधं आणि गोळ्या जप्त
- या सेंटरचे काम एजंटच्या माध्यमातून चालवले जात होते, कारवाईनंतर डॉक्टर फरार.
विशाल पुजारी
कोल्हापुरात गर्भलिंग निदान संदर्भात मोठी कारवाई करण्यात आली. करवीर तालुक्यात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर गर्भलिंग निदान चाचणीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. करवीर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणानंतर सर्वच जण हादरून गेले आहेत. गर्भलिंग निदान हे कायद्याने गुन्हा आहे. या विरोधात कडक कायदा आहे. या आधीची अशी रॅकेट उद्धवस्त करून कडक कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर ही अशा पद्धतीची कामं केली जात असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.
करवीर तालुक्यातील बालिंगा येथे गोपनीय माहितीद्वारे पोलीस आणि आरोग्य विभागाला गर्भलिंग निदान केले जात असल्याचं समजलं होतं. त्यानुसार पथकाने या ठिकाणी छापेमारी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या नुसार संबंधीत ठिकाणी पथकाने छापेमारी केली. बालिंगा येथील सेंटरवर ही कारवाई झाली. दोन्ही विभागाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. या छापेमारीमध्ये गर्भलिंग निदान संदर्भात धक्कादायक साहित्य तिथे आढळून आले.
हे सर्व राजरोस पणे न घाबरता सुरू होते. तिथे गर्भलिंग निदान चाचणीचे मशिन, औषध आणि गोळ्या पथकाला आढळून आल्या. त्यात तातडीने जप्त करण्यात आल्या. सेंटरवर छापेमारी झाल्याची माहिती संबंधित डॉक्टरला मिळाली. त्यानंतर तो तिथून फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. हे सेंटर काही एजंटच्या मार्फत चालवले जात होते. त्यांच्या मार्फतच गर्भलिंग निदान करण्यासाठी पेशंट इथं आणले जात होते. असा एजंटचा ही तपास लागला आहे. घटनेच्या पंचनाम्यादरम्यान गर्भलिंगनिदान चाचणी संदर्भात अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे.
बालिंगा या ठिकाणी यापूर्वी सुद्धा एकदा गर्भलिंगनिदान चाचणी संदर्भात कारवाई झालेली होती. पुन्हा याच परिसरामध्ये हे रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. बालिंगा हा कोल्हापूर शहरालगतचा आणि ग्रामीण भागाला जोडला जाणारा भाग आहे. त्यामुळे ग्रामीण भाग आणि कोल्हापूर जिल्ह्याबाहेरून गर्भलिंग निदान केलं जातं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.