विशाल पुजारी
तृतीयपंथी म्हणले की त्यांच्याकडे पाहाण्याचा समाजाचा दृष्टीकोन हा वेगळा असतो. अनेक गोष्टी पासून त्यामुळे ते वंचित राहातात. शिवाय समाजाच्या मुख्य प्रवाहापासूनही ते लांब फेकले जातात. त्यांना समाजाच वावरता येत नाही. किंवा त्यांना समाजाच समावूनही घेतलं जात नाही. त्यामुळे त्याचं जग हे वेगळच आणि पीडित स्वरूपाचं होवून बसतं. तरीही काही तृतीयपंथी आपल्या कतृत्वाने समाजात आपला वेगळा ठसा उमटवतात. आपल्या कामगिरीने आपली दखल घ्यायला भाग पाहता. त्यात मग कोणी शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी मारताना दिसतो तर कुणी उद्योग क्षेत्रात ठसठशीत कामगिरी करतो. अशीच एक घटना कोल्हापूरात पाहायला मिळाली आहे. या आधी कोणत्याही तृतीयपंथीला जे जमले नाही ते कोल्हापूरच्या तृतीयपंथीने करून दाखवले आहे.
महाराष्ट्रात एक ऐतिहासिक पाऊल उचलत कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच तृतीयपंथी समुदायाला रेशन दुकानाचा परवाना मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मैत्री संघटनेला रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना मंजूर झाला आहे. कोल्हापुरात मुख्यमंत्री रोजगार मेळाव्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते मयुरी आळवेकर यांना हा परवाना प्रदान करण्यात आला. त्यामुळे मयुरी ही तृतीयपंथी आणि तिचे सहकारी हा व्यवसाय पुढे नेण्यार आहे. त्यातून त्यांना एक रोजगाराची संधी ही उपलब्ध झाली आहे. ते आता स्वत:च्या पायावर उभे राहाणार आहेत.
तृतीयपंथी समुदायाला भेदभाव, गरिबी, सामाजिक बहिष्करण आणि रोजगाराच्या संधी मिळण्यातील अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, त्यांना रोजगाराचे साधन आणि मूलभूत हक्क मिळावेत, यासाठी मैत्री संघटनेने राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नवीन रास्त भाव धान्य दुकान प्रक्रिया राबवली. त्यानुसार, कोल्हापूर शहरात मैत्री संघटनेची निवड करून त्यांना नवीन दुकानाचा परवाना देण्यात आला. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असल्यामुळे तृतीयपंथी समुदायासाठी एक आदर्श निर्माण झाला आहे.
नक्की वाचा - Garba viral video: गरबा नाईट मधला किसींग व्हिडीओ Viral, शेवटी त्या कपलला...
या निर्णयामुळे तृतीयपंथींना एक वेगळं दालन खुलं झालं आहे. राज्यात पहिलांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे इतर तृतीयपंथीयांसाठीही आशेचे किरण निर्माण झाले आहे. असा पद्धतीची वेगवेगळी दालनं तृतीयपंथीयांसाठी उघडली गेल्यास त्यांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे. शिवाय त्यांचा आत्मविश्वासही वाढणार आहे. सरकारचं हे पाऊल नक्कीच कौतूकास्पद आहे. यातून भेदभाव संपण्यासही मदत होणार आहे. शाहू महाराजांच्या कोल्हापुरातच हे होत असल्यानं हा योगायोग म्हणावा का अशी चर्चा सुरू झाली आहे.