Kolhapur News: जिल्हा परिषद शाळेत आता 'नो मोअर बॅक बेंचर्स' पद्धत, काय आहे हा केरळ पॅटर्न?

शासनाने केलेला हा नवा बदल स्वागतार्ह आहे असं मुख्याख्यापक संजय लोंढे यांनी सांगितलं.

जाहिरात
Read Time: 3 mins
कोल्हापूर:

विशाल पुजारी 

केरळ राज्याच्या धर्तीवर आता कोल्हापूरात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. केरळ राज्यातील मल्याळम चित्रपटात 'नो मोअर बॅक बेंचर्स' सीन दाखविण्यात आला आहे. त्यानुसार केरळमधील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था बदलण्यात आली आहे. त्यात आता कोणीही बॅक-बेंचर्स असणार नाही. आता केरळमध्ये शाळांमध्ये विद्यार्थी यू-आकारात बसतात. त्यामुळे याचं पद्धतीने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. 

गेली अनेक वर्षे एकामागोमाग बसलेले विद्यार्थी हे चित्र आता कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बदलले आहे. पाठीमागच्या बाजूला नेहमी बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मक भावना वाढू नये आणि त्यांच्यामध्येही आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी गोलाकार बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. अशा पद्धतीची बैठक व्यवस्थेची अंमलबजावणी करणारा कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली आहे. ‘मिशन ज्ञान कवच' असे या उपक्रमाला नाव देण्यात आले आहे. पुढच्या बाकावर बसणारे विद्यार्थी हे नेहमी प्रश्नांना उठून उत्तरे देतात. साहजिकच अनेकदा शिक्षकांचेही पुढे बसणाऱ्या मुलांकडे अधिक लक्ष असते. 

नक्की वाचा - CIDCO News: घरांच्या किंमत कमी करण्याबाबत सिडको सकारात्मक, 22 हजार घरांची लॉटरी ही लवकरच

मिशन ज्ञानकवच उपक्रमांतर्गत कोल्हापूरातील प्राथमिक शाळेत केरळ मधील 'नो मोअर बॅक बेंचर्स वर्ग पद्धत सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने हे पाऊल उचललं आहे. शाळांमध्ये विद्यार्थी एका पाठीमागे एक बसलेले असतात. अशाप्रकारची बैठक व्यवस्था प्रत्येक शाळांमध्ये पहावयास मिळते. या बैठक व्यवस्थेमुळे पुढे बसणारे विद्यार्थी हुशार होतात, तर मागच्या बाकावर बसणारा विद्यार्थी मागे राहतात असा समज आहे. हा समज पालकांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी बैठक व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. 

नो मोअर बॅक बेंचर्स या संकल्पनेतून सुरू झालेली ही बैठक व्यवस्था आता कोल्हापूरातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये दिसणार आहे. विद्यार्थी आनंदाने या नव्या बैठक व्यवस्थेचे स्वागत करत आहेत. ज्या वर्गामध्ये विद्यार्थी जास्त आहेत त्या वर्गात या बैठक व्यवस्थेला काही प्रमाणात अडचण ही निर्माण होते. मात्र या बैठकी व्यवस्थेमुळे पूर्वीपेक्षा शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष ठेवणं सोपं झालं आहे. कोल्हापुरातल्या जिल्हा परिषद शाळा मधली या बैठक व्यवस्थेची जिल्ह्यात चर्चा आहे. ही बैठक व्यवस्था पाहिली तर सहाजिकच प्रत्येक मुलावर लक्ष जातं असं दिसून येतं. त्यामुळे ही बैठक व्यवस्था जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना फायदेशीर ठरेल अशाच प्रतिक्रिया सामान्य वर्गातून आहेत.

Advertisement

नक्की वाचा - Public Health Scheme: महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेबाबत मोठी बातमी, सरकारने केला मोठा बदल

शासनाने केलेला हा नवा बदल स्वागतार्ह आहे असं मुख्याख्यापक संजय लोंढे यांनी सांगितलं. आम्ही आमच्या कन्या व कुमार विद्या मंदिरामध्ये ही नवी बैठक व्यवस्था लागू केली आहे. या बैठक व्यवस्थेमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण सोपं झालं आहे. पूर्वी काही विद्यार्थी पाठीमागे बसून संपूर्ण शिक्षण घ्यायचे. मी विद्यार्थी मुद्दामहून पुढे येऊन बसत नव्हते. शिक्षकांचा यापूर्वी सुद्धा या सगळ्यांवर लक्ष होतं. मात्र नव्या बैठक व्यवस्थेमुळे हे लक्ष ठेवणं अधिक सोपं झाला आहे. जास्त पटसंख्या असलेल्या वर्गात ही बैठक व्यवस्था थोडीशी अडचणीची आहे. पण या बैठक व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांनी शिक्षक या मधला दुरावा कमी झाला आहे हे म्हणावं लागेल. असं मत उचगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय लोंढे यांनी व्यक्त केलं.