मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. खेड- दिवाण खवटी दरम्यान दरड रेल्वे रुळावर आली आहे. मोठ्या प्रमाणावर माती आणि दगड रेल्वे रुळावर आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे.तर या दरम्यान असणाऱ्या गाड्या खेड, दिवाणखवटी, चिपळूण या रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. सध्या कोकण कोकण रेल्वेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. दरड हटविण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. पण मार्ग सुरळीत सुरू होण्यास अडीच ते तीन तास लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोकणात पावसाचा जोर कायम आहे. कोकणात आज काही भागात पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्हात सकाळपासून पावसाची संततधार सुरु होती. अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. तर नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे वेंगुर्ला होडावडे तळवडे पुलावर पाणी आले होते. त्यामुळे पर्यायी वेंगुर्ले मठ मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती. कसाल, आंब्रड पोखरण, कळसुली, मार्गावर कुंदे येथे पुलावर पाणी आल्याने कसाल कळसुली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - पुढचा मुख्यमंत्री कोण? सत्तारांनी थेट नाव घेतले, किती जागा जिंकणार तेही सांगितले
मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर आहे. मात्र ही जगबुडी नदीने ही धोका पातळी ओलांडली असून सध्या जगबुडी नदी 8 मीटरवर वाहत आहे. त्यामुळे खेडमध्ये काही लोकांच्या घरापर्यंत पाणी आलं आहे. प्रशासन देखील सतर्क झालं आहे. नागरीकांनी व व्यापारी बंधूंनी शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.
खेड मटण मार्केट परिसरात देखील जगबुडी नदीचं पाणी शिरलं आहे. नगरपरिषदेकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तीन तासांपासून खेडमध्ये मुसळधार कोसळत आहे. नारंगी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नारंगी नदीचं पाणी वाढल्याने खेड-दापोली मार्गावरची वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. शेकडो हेक्टर शेती देखील पाण्याखाली गेली आहे.