Lalbaugcha Raja Visarjan Delay: मुंबईकरांचे लाडके दैवत असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाला समुद्राच्या भरतीमुळे थोडा विलंब झाला आहे. गिरगाव चौपाटीवर राजाची मूर्ती विसर्जनासाठी पोहोचल्यावर अचानक भरतीचे पाणी वाढल्याने विसर्जन थांबले. मात्र, यामुळे भाविकांची श्रद्धा तसूभरही कमी झालेली नाही, उलट ते शांतपणे आपल्या राजाच्या निरोपाची वाट पाहत आहेत.
मुंबईकरांचा लाडका बाप्पा अशी ओळख असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनास यंदा समुद्राने मोठा अडथळा निर्माण केला आहे. सकाळपासून लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी उभा आहे मात्र समुद्राला उधाण आल्याने नव्या तराफ्यावर मुर्ती चढवण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले असून समुद्र शांत झाल्यावर मुर्ती विसर्जित करण्यात येणार आहे. लालबागच्या मंडळासाठी गणेश गल्लीचं मंडळही धावून आले असून गणेश गल्लीचे कार्यकर्ते मदतीसाठी आहेत.
आज सकाळी सुमारे साडे आठच्या सुमारास लालबागचा राजा विसर्जनसाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे आगमन झाले त्यावेळी भरतीचे पाणी वेगाने वाढत होते. त्याचवेळी गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजाचे तराफ्याजवळ आगमन होताच वेगाने वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे लालबागचा राजाच्या मूर्तीचा पाट तरंगू लागला. त्याचा परीणाम असा झाला की लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेणारा तराफा आणि मूर्तीचा पाट यांची भरतीच्या पाण्याच्या हेलकाव्यांमुळे जुळणी होत नव्हती
दिड तास कोळी बांधव सातत्याने लालबागच्या राजाचा पाट आणि तराफा यांची जुळणी करण्याचा आटोकाट प्रयत्नं करत आहेत. मात्र भरतीच्या पाण्याचा लोंढा प्रचंड वाढल्यामुळे भरतीचे पाणी कमी होण्याची वाट पहाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता लालबागच्या राजाचे विसर्जन समुद्राच्या भरतीचे पाणी थोडे कमी झाल्यावर करण्यात येईल. गेल्या पाच तासांपासून भाविकही लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळा पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीवर थांबून आहेत. मात्र राजा पाच तासांपासून पाण्यात थांबून असल्याने त्यांच्याही चेहऱ्यावर चिंता दिसत आहे.