त्रिशरण मोहगावकर, लातूर:
Shivraj Patil Passes Away: राज्याच्या राजकारणातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे दुःखद निधन झालं आहे. आज पहाटे(शुक्रवार, 12 डिसेंबर) अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शिवराज पाटील चाकूरकर हे आजन्म काँग्रेसचे निष्ठावंत राहिले. गेल्या काही वर्षांपासून ते राजकारणापासून निवृत्त झाले होते.
काँग्रेसचे निष्ठावंत, 7 टर्म खासदार..
राज्यासह देशाच्या राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून शिवराज पाटील चाकूरकर यांची ओळख होती. 1980 मध्ये शिवराज पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. 1980 मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले. त्यानंतर 1999 पर्यंत सलग सात वेळा त्यांनी निवडणूक जिंकत केंद्रीय राजकारणात आपला दबदबा निर्माण केला.
गुड न्यूज! कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात GCC स्थापन होणार; जिल्ह्यांच्या विकासाला नवी दिशा मिळणार
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात त्यांनी राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री अशी अनेक पदे भूषवली. देशाचे 10 वे लोकसभा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. गेल्या काही वर्षांपासून शिवराज पाटील चाकूरकर हे राजकारणापासून अलिप्त होते. त्यांच्या पश्चात मुलगा शैलेष पाटील चाकूरकर सुन अर्चना पाटील चाकूरकर आणि नातवंडे असा परिवार आहे. आज लातूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.