अमोल गावंडे, प्रतिनिधी
Lonar Lake: बुलडाणा जिल्ह्यातील जागतिक कीर्तीचे लोणार सरोवर यावर्षीच्या मुसळधार पावसामुळे चर्चेत आले आहे. सरोवरातील पाण्याची पातळी लक्षणीय वाढल्याने परिसरातील 20 पैकी तब्बल 12 प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाचे जतन धोक्यात आल्याची भीती व्यक्त होत आहे.
ऐतिहासिक मंदिरांवर जलसंकट
लोणार सरोवराभोवती हेमाडपंती शैलीतील अनेक प्राचीन मंदिरे आहेत. वाढत्या पाणीपातळीमुळे ही मंदिरे पाण्याने वेढली गेली असून, त्यांच्या बांधकामाचे आणि कलाकुसरीचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. ही परिस्थिती केवळ स्थानिक नागरिकांसाठीच नाही, तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळापैकी एक असलेल्या या सरोवराच्या सांस्कृतिक महत्त्वालाही धोकादायक आहे.
( नक्की वाचा : Akola News : अकोल्यात कृषीमंत्र्यांसमोरच शेतकऱ्यांचा 'संताप', पांदण रस्त्यांवरून थेट विचारला जाब )
कमळजा माता मंदिराच्या नवरात्रोत्सवावर परिणाम
सरोवराच्या आतल्या काठावर वसलेले कमळजा माता मंदिर हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. वाढत्या पाण्यामुळे मंदिराच्या ओट्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. त्यामुळे, यंदाच्या नवरात्रोत्सवात भाविकांना दर्शनासाठी मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. दरवर्षी हजारो भाविक नवरात्रीत या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. पण यावर्षी पाणीमुळे प्रवेश मार्ग बंद झाल्यास उत्सवावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. सरोवराभोवती योग्य जलनिस्सारण व्यवस्था उभारून मंदिरांचे जतन करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या नैसर्गिक संकटामुळे लोणारच्या पर्यटनावर आणि धार्मिक वातावरणावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती जाणकार व्यक्त करत आहेत.