'उद्योगधंदे गुजरातला, महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा', जयंत पाटलांची फटकेबाजी

चिपळूण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा झाली. यावेळी जयंत पाटील यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

जाहिरात
Read Time: 3 mins

राकेश गुडेकर, प्रतिनिधी: चिपळूण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज (शुक्रवार, 8 नोव्हेंबर) चिपळूणमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी जयंत पाटील यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आपलं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले जयंत पाटील?

 "प्रशांत यादव यांनी उभा केलेला दूध प्रकल्प पाहिल्यावर माझ्या दूध प्रकल्पाला फोन करून सांगितलं हा प्रकल्प बघा. इथल्या आमदारांनी गद्दारी केली आणि प्रशांत यादव यांचा उदय झाला.यादव यांची प्रतिमा चांगली आहे स्वच्छ चेहरा आम्हाला मिळाला याचा आनंद आहे. पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब,काँगेसची ताकद यादव यांच्या मागे आहे. त्यामुळे प्रशांत यादव हे नक्की आमदार होणार असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

 आजवर महाराष्ट्रातील उद्योग धंदे,प्रकल्प,मोठ्या कंपन्यांची कार्यालये गुजरातला कसे धाडले? हे सांगताना महाराष्ट्र गुजरातला आंदण दिला आहे म्हणूनच एक दोन नव्हे तर सतरा प्रकल्प दिल्लीश्वरांची मर्जी राखण्यासाठी गुजरातच्या घशात घातले. आपला महाराष्ट्र बेरोजगार, आर्थिक कमकुवत करण्यासाठी महायुतीचे सरकार खंबीरपणे वाटचाल करीत आहे. महाराष्ट्रातून गेलेल्या प्रकल्पापेक्षा मोठे प्रकल्प आम्ही महाराष्ट्रात आणू असे मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आला अशी टिकाही जयंत पाटील यांनी महायुतीच्या सरकारवर केली.

भाजप, महायुतीवर निशाणा

"भारताच्या एकंदर उत्पन्नातील महाराष्ट्राचा वाटा 2 टक्क्यांनी कमी झाला म्हणजे काही लक्ष करोड रुपये उत्पन्न कमी झाले. महाराष्ट्र अधोगतीला लागला. याचे श्रेय देवेंद्र फडणवीस,मोदी,शहा या त्रिकुटाना जाते. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना अर्थमंत्री म्हणून वशिष्ठी नदीतील गाळ उपसून नदीपात्र खोल व रुंद करण्यासाठी निधी मंजूर केला. मध्यंतरीच्या काळात सरकार पाडले. विकास कामांसाठी पक्ष फोडला, पक्ष सोडला त्यांनी चालू कार्यकाळात आधी मंजूर केलेला निधी आजवर पुरवला का नाही? अर्थमंत्री आपलेच होते ना? आमचे पक्ष फोडले, भाजपला शरण गेले. त्यांनी  आपल्यावर असलेल्या शरद पवार यांच्या उपकाराकडे पाठ कशी  फिरवली? साथ कशी सोडली? असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला. 

"ना शिवस्मारक झालं,ना विश्वगुरु झालो, ना दाऊद-मल्याला फरफटत आणलं,ना महागाई कमी झाली. 18 ते 20 तास काम करून स्वयंघोषित चौकीदार काय करत होता. 70 हजार कोटींचा घोटाळा झाला असा आरोप मोदींनी केला आणि 4 दिवसांत सगळे पळून गेले. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप भाजपने केला आहे, त्यांना उमेदवार म्हणून भाजपने स्वीकारलं आहे. माणसाला बदनाम,नामोहरम करता, तुरुंगात घालता, बाहेर काढता तुमच्या बाजूला बसवता, अशा शब्दात भाजपवर निशाणा साधत त्यांनी येत्या काळात सर्वांनी एकदिलाने काम करावे. प्रशांत यादव यांना आमदार करावे," असे आवाहनही त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांना  केले.