Maharashtra Assembly Monsoon Session 2025: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी- विरोधकांमध्ये जोरदार घमासान सुरु आहे. मात्र आजच्या विधान परिषदेत सत्ताधारी आमदारच मंत्र्यावर बरसलेले पाहायला मिळाले. लांजा येथे फणस संशोधन केंद्र स्थापन करण्याची मंजुरी देण्यावरून विधान परिषदेत भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात काहीसा वाद झाला. कोकणाला नेहमीच दुय्यम स्थान दिल जातं अशी खंत प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवली.
नेमकं काय घडलं?
डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र लांजा येथे फणस संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी 40 कोटी रुपये रकमेचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे. मात्र हे संशोधन केंद्र एका वेगळ्या जागेसाठी विद्यापीठात स्थापन करण्याची चाचणी आणि विद्यापीठाकडे प्रस्ताव सरकारने ठेवला असल्याचं मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. अतिरिक्त पैसे इन्फ्रास्ट्रक्चर साठी जे लागणार होतं ते अनावश्यक पैसे वाचवण्यासाठी संशोधन केंद्र एका विद्यापीठात उभं करू असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
परंतु प्रयोगशाळा असताना संशोधन केंद्र जिथे प्रस्ताव दिला आहे तिथेच सुरू करावं अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी लावून धरली. यावर माणिकराव कोकाटे यांचं अपेक्षित उत्तर न मिळाल्याने आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रवीण दरेकर यांनी सभागृहामध्ये थेट माणिकराव कोकाटे यांना सुनावलं. कोकाटे मंत्रीपद लटकवा असं थेट सभागृहात प्रवीण दरेकर यांनी माणिकराव कोकाटे यांना सांगितले. या एका मुद्द्यावरून भाजपचे आमदार आपल्याच मंत्र्यांवर सभागृहात बरसले.