महाराष्ट्र राज्याचा 2025- 26 चा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महायुती सरकारचा नवा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या या महाबजेटमधून लाडक्या बहिणींसाठी काय मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. आजच्या अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानत सर्वात महत्वाची घोषणा केली आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आजचा अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे, असं अजित पवार यांनी म्हटले आहे.
तसेच या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे, असल्याचेही म्हणाले. दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा होईल, अशी शक्यता होती. महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये केले जातील, असं म्हटले जात होते. मात्र या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहीणींसाठी कोणतीबी मोठी घोषणा केलेली नाही. यावरुनच विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.