Election INK Controversy Fact Check: राज्यामध्ये 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होत आहे. सकाळपासून सुरु झालेल्या या मतदानात अभूतपूर्व असा गोंधळ आणि निवडणूक आयोगाचे ढिसाळ नियोजन पाहायला मिळत आहे. ईव्हीएममध्ये बिघाड, नावांचा घोळ अशा तक्रारी मतदारांकडून येत असतानाच आता मतदानानंतर बोटांना लावलेली शाई पुसली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. नेलपेंट रिमूव्हरने शाई पुसली जात असल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहे. खरंच मतदानानंतर लावलेली शाई पुसली जात आहे का? याबाबतच एनडीटीव्ही मराठीने फॅक्ट चेक केला आहे.
खरंच बोटांना लावलेली शाई पुसली जात आहे का?
एनडीटीव्ही मराठी डिजिटलचे हेड श्रीरंग खरे यांनी डोंबिवली येथे, तसेच प्रविण वाकचौरे यांनी कळवा आणि संकेत गोलतकर यांनी दादरमध्ये आज सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर बोटांना लावलेली शाई खरंच पुसली जात आहे का? याबाबत एनडीटीव्हीच्या स्टुडिओमध्ये या तिन्ही प्रतिनिधींनी फॅक्ट चेक केला. यासाठी नेलपेंट रिमूव्हरचा वापर करुन बोटांना लावलेली शाई पुसली जात आहे का? हे पाहिले.
NDTVच्या फॅक्टचेकमध्ये धक्कादायक खुलासा
यावेळी तिघांच्याही बोटाला लावलेली शाई नेलपेंट रिमूव्हर तसेच सॅनिटायझरच्या सहाय्याने पुसली जात असल्याचे निदर्शनास आले. म्हणजेच राज्यातील विविध भागांमधून मतदानानंतर बोटांना लावलेली शाई पुसली जात असल्याचा जो आरोप होत आहे. त्यामध्ये तथ्य आढळून आले. या धक्कादायक प्रकारामुळे बोगस मतदान तसेच दुबार मतदान होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आता होत आहे.