राहुल तपासे, प्रतिनिधी:
Tara Tiger Relocation In Sahyadri: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघ पुनर्स्थापन मोहिमेला आज आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले. ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणलेली दोन वर्षांची मादी वाघीण T7-S2 हिला चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली अनुकूलन कुंपणात सुरक्षितपणे सॉफ्ट रिलिज करण्यात आले. ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ताडोबाच्या कोलारा कोअर रेंजमधून या वाघीणीला पकडण्यात आले होते. ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीत ती पूर्णतः तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले. रॅपिड रेस्क्यू टीमचे पशुवैद्य डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी तिची सखोल आरोग्य तपासणी केली.
Leopard Attack : बिबट्या माणूस खात नाही, ते त्याचं अन्न नाही; तरीही हल्ला का करतो? तज्ज्ञ म्हणाले...
ताडोबाची वाघीण सह्याद्रीत
अनुकूलन कुंपणातील सॉफ्ट रिलिज प्रक्रियेमुळे वाघीणीला सह्याद्रीतील भूप्रदेश, भक्ष्यप्रजाती आणि स्थानिक वातावरणाशी हळूहळू जुळवून घेता येते. नंतर मुक्त जंगलात सोडण्यापूर्वी ही पद्धत तिच्या सुरक्षित हालचालीला आणि स्थानिक स्थैर्याला अधिक आधार देत असल्याचे वन विभागाचे मत आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर भारतीय वन्यजीव संस्थेचे (WII) वैज्ञानिक मार्गदर्शन लाभले. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. के. रमेश व फील्ड बायोलॉजिस्ट आकाश पाटील वाघीणीच्या वर्तनाचे निरीक्षण करीत आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) देखील या मोहिमेवर लक्ष ठेवून आहे.
वाघीणीची पकड, वाहतूक आणि सॉफ्ट रिलिजची अंमलबजावणी ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीमसह क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी सुरळीत पार पाडली. ताडोबा व सह्याद्री या दोन्ही व्याघ्र प्रकल्पांच्या संयुक्त पथकांनी ही मोहिम राबवली असून संपूर्ण नियोजन मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. जितेंद्र रामगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला म्हणाले, “T7-S2 ही तरुण, सशक्त व नैसर्गिकरीत्या भ्रमणशील मादी आहे. तिचे स्थलांतर सह्याद्रीतील वाघ संवर्धनाला नवी ऊर्जा देईल.” सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले, “ही मादी वाघीण उत्कृष्ट आरोग्यदर्शक असून चांदोली परिसरात तिच्यासाठी आवश्यक असा सुरक्षित अधिवास उपलब्ध आहे. तिच्या सततच्या देखरेखीसाठी आमचे पथक सज्ज आहे.”
मुख्य वन्यजीव प्रतिपाल एम. श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले की, “दोन्ही व्याघ्र प्रकल्पांच्या समन्वयामुळे महाराष्ट्रातील वाघ संवर्धन प्रयत्नांना बळकटी मिळत आहे. ही पुनर्स्थापन प्रक्रिया आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचे प्रतीक आहे.” ‘ऑपरेशन तारा' अंतर्गत सह्याद्रीत दुसऱ्या मादी वाघीणीचे यशस्वी पुनर्स्थापन होत असल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघ संवर्धन मोहिमेला मोठा दिलासा मिळाला आहे.