महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ( मंगळवार, 21 मे) जाहीर झाला. या परीक्षेत छत्रपती संभाजीनगरच्या तनिशा बोरमाणिकरनं 100 टक्के मार्क्स मिळवले आहेत. तनिशानं बारावीच्या परीक्षेत 582 आणि क्रीडामधील 18 असे एकूण 600 पैकी 600 मार्क्स मिळवले आहेत. शंभर टक्के मार्क्स मिळवणारी ती राज्यातली एकमेव विद्यार्थिनी ठरलीय. तनिशानं 'NDTV मराठी' शी बोलताना तिच्या यशाचं रहस्य सांगितलंय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्या गोष्टीचा सर्वात जास्त फायदा?
बारावीमध्ये 95 टक्के पेक्षा जास्त मार्क्स मिळतील असं वाटलं होतं. 100 टक्के मार्क्स मिळणं हा माझ्यासाठी देखील आनंदाचा धक्का असल्याचं तनिषानं सांगितलं. मी स्पर्धांमध्ये व्यस्त असल्यानं शेवटची दोन महिने संपूर्ण फोकसनं अभ्यास केला. रोज टार्गेट निश्चित करुन अभ्यास केला. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्या. त्याचा फायदा झाल्याचं तनिशानं सांगितलं.
( नक्की वाचा : विदर्भातल्या शेतकऱ्याचा मुलगा JEE मेन्समध्ये देशात पहिला, जाणून घ्या यशाचं गुपित )
बुद्धीबळपटू असलेल्या तनिशाला क्रीडा कोट्यातील 18 मार्क्स अतिरिक्त मिळाले. त्यामुळे ती हे 'शंभर नंबरी' यश मिळवू शकली. बुद्धीबळाचा माझ्या अभ्यासात मोठा फायदा झाला. त्यामुळे माझी समज आणि आकलनशक्ती वाढली, असं तनिशानं सांगितलं. मी माझा निकाल पहिल्यांदा पाहिला तेंव्हा 600 एकूण मार्क्स आहेत, असं वाटलं होतं. इतके मार्क्स मला मिळालेत असं वाटलं नाहीत, अशी भावना तिनं व्यक्त केली. माझ्या यशाचा आई-वडिलांना झालेला आनंद हा अवर्णनीय असल्याचं तिनं सांगितलं.
( नक्की वाचा : CBSE Result : कोणताही क्लास न लावता राज्यात टॉप, संभाजीनगरच्या मुलीनं करुन दाखवलं )
यावर्षी बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 97.51 टक्के निकाल लागलाय. तर मुंबई विभागाचा सर्वात कमी 91.95 टक्के निकाल आहे. यंदा 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले.